TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका नोंदी शोधणार; केली नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची माहिती

पिंपरी : मराठा समाजास मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने महापालिकेशी संबंधित अभिलेखांमध्ये उपलब्ध असलेल्या पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करून दस्तावेजांची पुर्तता करून घेण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे. संपुर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मराठा समाजातील संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी कशी करावी, तपासणीअंती कुणबी जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करून अहवाल शासनास सादर करण्याकामी निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १९४८ ते १९६७ या कालावधीतील जन्म-मृत्यु नोंदी, शैक्षणिक अभिलेख, भूमी अभिलेख, सेवानोंद पुस्तके तसेच महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या करआकारणी नोंद रजिस्टरमध्ये कुणबी जातीच्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून त्याबाबतचा अहवाल शासनाच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार सादर करण्यासाठी निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कामकाजाच्या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित विभागांना काही आदेशदेखील देण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, भूमि व जिंदगी, लेखा विभाग तसेच करआकारणी व करसंकलन विभागाच्या प्रमुखांनी सन १९४८ ते १९६७ या कालावधीमध्ये महापालिकेच्या उपलब्ध अभिलेखांची छाननी करून अभिलेखांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी असल्याचे आढळून आल्यास अशा पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी केली जाणार आहे.

या कामकाजासाठी संबंधित विभागाचे प्रमुख जबाबदार असणार आहेत. या विभागप्रमुखांनी नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामकाज पुर्ण करावे असे आदेशात नमूद केले आहे. या कामकाजासाठी संबंधित विभागाचा कर्मचारी वर्गाची नियुक्ती करावी, पुराव्याच्या तपासणीअंती विभागस्तरावर स्वतंत्र रजिस्टर तयार करण्यात यावे तसेच विवरण पत्रामध्ये माहितीच्या नोंदी आणि संकलन करून ते नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करावे. नोडल अधिकाऱ्यांना आवश्यकता वाटल्यास अधिकची माहिती अथवा पुरावे जमा करण्याकामी संबंधित विभागांना अथवा विभागप्रमुखांना निर्देश देता येणार आहेत. हे काम कालमर्यादित असून विहीत वेळेत कामकाज पुर्ण करावे, असे आयुक्त शेखऱ सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button