breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ राष्ट्रवादी- काँग्रेसमधील ४० आमदार फुटणार? 

विरोधी पक्षनेते अजित पवार मोठ्या बंडाच्या तयारीत : २०२४ च्या लोकसभानिवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलाढाल

पुणे । विशेष प्रतिनिधी 

केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपा महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ यशस्वी करण्याच्या तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार तब्बल ४० आमदार घेवून भाजपात प्रवेश करणार आहेत. संबंधित आमदारांच्या सहमतीपत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या असून, महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ खिळखिळी होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचाने आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील शिवसेनानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे आमदार भाजपा फोडणार आहे. तसेच, राष्ट्रवादीतील मोठा गट आणि १० बडे नेते भाजपावासी होण्याच्या तयारीत आहेत. यासह काँग्रेसमधील एक बडा नेता आपल्या समर्थक आमदारांसह भाजपत जाऊ शकतो. दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ही दोन आमदारांवर भाजपाची नजर आहे. पुन्हा निवडून येऊ शकणाऱ्या आमदारांना भाजपकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. 

खासदारसुप्रिया सुळे यांच्या हाती पक्षाची धुरा… 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी अदिती नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे प्रदेश कार्यालयाचे प्रशासन, दैनंदिन पत्रव्यवहार, प्रचार साहित्य वाटप यांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

नलावडे या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत विश्वासातल्या समजल्या जातात. साहजिकच त्यांच्या नियुक्तीनंतर सुप्रिया सुळे यांचा प्रदेश कार्यालयातील वरचष्मा वाढणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या संभाव्य बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे सुप्रिया सुळे यांच्या हातात एकवटणार हे निश्चित मानले जाते.

अजित पवारांची राष्ट्रवादीकडूनच कोंडी?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अस्वस्थतेला पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हेच एकटे जबाबदार असल्याचे चित्र जाणीवपूर्वक तयार केले जात असून त्यांच्या संदर्भातील छोट्या छोट्या गोष्टींनाही अवास्तव प्रसिद्धी दिली जात असल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये तयार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणताही मोठा नेता यामध्ये तोंड उघडण्यास तयार नसून हे वातावरण निवळण्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नसल्याने अजित पवार यांना टोकाचा निर्णय घेण्यास भाग पाडण्याचीच ही खेळी असल्याचीही चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
वज्रमुठ सभेत न बोलण्याच्या अटीवर आले होते अजित पवार?
नागपुरात होणाऱ्या वज्रमूठ सभेच्या आधी अजित पवार ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. ते सभेला येणार की नाही?, यावरूनही चर्चा झडत होत्या. सभा सुरू होताच अकोल्याचे नितीन देशमुख, ठाण्याचे जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाषणे झाली. मात्र अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित न केल्याने आश्चर्य व्यक्त झाले. संयोजक सुनील केदार यांच्या विशेष आग्रहावरून पवार हे नागपुरात आले होते. मात्र, येतानाच त्यांनी ‘मी सभेत बोलणार नाही’, ही अट घातली होती अशी माहिती पुढे येत आहे. सभेत न बोलणारे अजित पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारी बसले होते आणि दोघांमध्ये बराचवेळ ‘गुफ्तगू’ सुरू होते. ते नेमके काय बोलत होते?, ते कळू शकले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button