ताज्या घडामोडीमुंबई

१० मे रोजी विमानतळावर सहा तास ‘मेगाब्लॉक’,डागडुजीसाठी धावपट्टी राहणार बंद

 प्रतिनिधी | मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या १० मे रोजी सहा तास बंद राहणार आहेत. त्यामुळे विमानतळावरील वाहतूक त्यादरम्यान बंद असेल. त्याचा जवळपास १२२ उड्डाणांना फटका बसण्याची शक्यता आहे.

मुंबईचे विमानतळ आता जवळपास पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. आगामी काळ पर्यटनाचा असल्याने विमानांची ये-जा वाढणार आहे. त्याचवेळी जूनपासून पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यात अनेकदा धावपट्टीवर पाणी साचते. यामुळे धावपट्टी खडबडीत होण्याची शक्यता असते. या स्थितीत भर पावसात विमान धावपट्टीवरून घसरल्याच्या घटना या आधी घडल्या आहेत. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी धावपट्टीची डागडुजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) प्रशासनाने हाती घेतली आहे.

‘पावसाळ्यापूर्वीच्या डागडुजीसाठी विमानतळाची धावपट्टी मंगळवार, १० मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान बंद असेल. यादरम्यान विमानतळाच्या १४/३२ व ०९/२७, या दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील. या दरम्यान एकही विमान येणार नाही किंवा उड्डाण होणार नाही. तशी सूचना सर्व विमानसेवा कंपन्यांच्या वैमानिकांना देण्यात आली आहे,’ असे विमानतळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

धावपट्टी बंददरम्यान ११० देशांतर्गत व १२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे विमानतळावरून नियोजित आहेत. त्यातील काही उड्डाणे रद्द होऊ शकतात किंवा त्यांची वेळ बदलू शकते. त्यानुसार प्रवाशांनी वेळा बघून प्रवास करावा तसेच विमानसेवा कंपन्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button