ताज्या घडामोडीमुंबई

संप मिटूनही एसटी सेवा रखडतच!; ‘यामुळे’ ४० लाख प्रवाशांना फटका

मुंबई |  प्रतिनिधी

 संप मिटल्यानंतर एसटी पुन्हा एकदा धावू लागली आहे. कमाईचा हंगाम असलेल्या एप्रिल महिन्यात प्रवासी वाहतुकीतून महामंडळाने जवळपास ३०० कोटींची कमाई केली. रोज सरासरी २४ ते २५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत असले, तरी मर्यादित गाड्यांमुळे ४० लाख प्रवाशांना अजूनही एसटीने प्रवास करणे शक्य होत नाही.

एप्रिल आणि मे हे महिने महामंडळाचे सर्वाधिक उत्पन्नाचे मानले जाते. सुट्ट्या, तसेच यात्रा-जत्रांमुळे या महिन्यात जादा बसफेऱ्यांनाही प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभतो. यंदा मात्र गाड्यांच्या अनुपलब्धतेमुळे तसेच अनेक गाड्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावण्यासाठी योग्य नसल्याने त्याचा परिणाम प्रवाशांवर तसेच महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे.

२५ एप्रिलपर्यंत महामंडळाच्या ताफ्यात एकूण १७ हजार चार गाड्या होत्या. यापैकी एक हजार १२७ गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जातात. सध्या १२ हजार ५८६ गाड्या वापरात आहेत. उर्वरित गाड्या देखभाल-दुरुस्तीसाठी आगारात उभ्या आहेत. काही गाड्यांचे आयुर्मान पूर्ण झाल्याने प्रवासी वाहतुकीसाठी त्या योग्य नाहीत. आगामी सहा महिने तरी महामंडळाकडून नवी गाडी दाखल होण्याची शक्यता कमी आहे. करोना पूर्वी महामंडळाच्या ताफ्यातील १७ हजार प्रवासी गाड्या धावत होत्या. त्यावेळी रोज ६५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले.

१ ते ३० एप्रिल या काळात महामंडळाने साडेबारा हजार बसगाड्यांच्या माध्यमाने रोज सरासरी २३ ते २५ लाख प्रवाशांची वाहतूक केली. या वाहतुकीच्या माध्यमातून एकूण २९६.७० कोटींचे उत्पन्न मिळाले. महामंडळाच्या ताफ्यात सुस्थितीत असलेल्या सर्व गाड्या सध्या प्रवासी सेवेत धावत आहेत, अशी माहिती महामंडळाने दिली.

एसटी वाहतूक पुन्हा जोमाने सुरू करण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. प्रवासी गाड्यांच्या मार्गात ‘ब्रेक डाऊन’ होऊ नये, यासाठी देखभालीनंतरच गाड्या रवाना करण्यात येतात. एप्रिलमध्ये जवळपास ३०० कोटींचे उत्पन्न मिळाले. मे महिन्यात ४०० ते ४५० कोटींचे उत्पन्न मिळू शकेल. जास्तीत जास्त गाड्यांनी प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयत्न आहे.

– शेखर चन्ने, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

महामंडळातील गाड्यांचा ताफा

साध्या गाड्या-१२८२७

मालवाहतूक -११२७

हिरकणी – ४३१

विना वातानुकूलित शयनयान – २१७

शिवशाही (बैठे आसन व्यवस्था)- ११११

अश्वमेध – १४०

मिडी बस – ६४

सिटी-१८४

मानव विकास – ८७२

एकूण – १७००४

स्रोत – एसटी महामंडळ (२५ एप्रिल २०२२पर्यंत)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button