ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील काहिलीच्या दिलाशाला अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त, ढगाळ वातावरणाची शक्यता

प्रतिनिधी | मुंबई

 मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानाने थोडा दिलासा दिला आहे. शनिवारपासून तापमान ३४ अंशाच्या आसपास आहे. शुक्रवारी सांताक्रूझ येथील ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानानंतर दोन ते तीन अंशांनी उतरलेल्या तापमानामुळे वातावरणातील उष्माही कमी झाला आणि त्यामुळे काहिलीही कमी झाली. सोमवारीही अनेक मुंबईकरांनी या कमी झालेल्या कमाल तापमानामुळे मुंबईत फिरणे सुसह्य झाल्याची भावना व्यक्त केली. अलिबाग वगळता उर्वरित कोकण भागात, तसेच मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी सोमवारी तापमान दिलासा मिळाल्याचे दिसले. बुधवारपासून राज्यभरातच काहिली काहीशी कमी होईल. मात्र, या काळात ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.

मुंबईमध्ये सोमवारी किमान तापमान सांताक्रूझ येथे २७.८ अंश सेल्सिअस होते. हे तापमान सरासरीपेक्षा १.८ अंशांनी अधिक होते. मंगळवारीही मुंबईत आभाळ काहीसे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस आभाळ निरभ्र असेल, तेव्हा किमान तापमान किचिंत खाली उतरू शकेल. तर कमाल अंशांचा पारा पुन्हा एकदा ३६ ते ३६ अंशांदरम्यान असू शकेल. नाशिकचे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार-बुधवारी राज्यभरात ढगाळ वातावरण, तसेच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. पण, या काळामध्ये शेतीची नियमित कामे सुरू ठेवावीत, असेही खुळे यांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारपासून पुढील तीन दिवस विदर्भ वगळता राज्यात उन्हाची काहिली काहीशी कमी होईल. त्यानंतर पुन्हा उष्णतेत वाढ होऊ शकते, असाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे. राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमानात बहुतांश ठिकाणी मे मधील सरासरी तापमानाहून वाढ असेल, असा अंदाज आहे. विदर्भात पारा चढाच असून, चंद्रपूर येथे ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अकोला येथेही ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे किमान तापमानाचा पाराही चढाच नोंदला गेला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर येथेही बुधवार, गुरुवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button