TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणेराजकारण

भाजपचे नऊ आणि शिंदे गटाच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ

पुणे : शिंदे-फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यात भाजपचे नऊ आणि शिंदे गटाच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. खातेवाटपानंतर अनेक आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटातील आमदारांना घेरण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील ‘या लोकांच्या चेहऱ्यावरून यांचा गेम झाला आहे असं वाटतं’, असं म्हणत निशाणा साधला आहे. तर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ‘ज्यांना आयुष्यात रुमणं कशाला म्हणतात ते माहित नसणारे अब्दुल सत्तार कृषी मंत्री होतात अन् दादा भुसे यांचा गेम’, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीची खाती आमच्याकडे आहेत आणि त्यांची खाते त्यांच्याकडेच आहेत, असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. मग या लोकांनी तिकडे जाऊन असा काय क्रांतिकारक बदल केला आहे? आदल्या दिवशी संजय शिरसाट आपल्या मतदारसंघातील लोकांना सांगत होते माझा उद्या शपथविधी आहे आणि अचानक त्यांचं नाव कट झालं. त्याच वेळेला बच्चू कडू यांचं नाव कट होतं आणि अब्दुल सत्तार यांचं नाव पुढे येतं. दादा भुसे यांच्याकडे असलेलं कृषीमंत्री पद जातं. कुळव कशाला म्हणतात, दांडा कशाला म्हणतात, रुमणं कशाला म्हणतात, पाळी, खुरपणी, पेरणी, दुबार पेरणी, तिबार पेरणी, खुळ पेरणी किंवा फवारणी कशाला म्हणतात या गोष्टी ज्यांना आयुष्यात माहित नाहीत, असे अब्दुल सत्तार कृषी मंत्री होतात. मग दादा भुसे यांनी काय मिळवलं?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

‘दादा भुसे असतील, बच्चू कडू असतील संजय शिरसाट, भरत गोगावले असतील या लोकांचा गेमच झाला आहे. आता या लोकांची अडचण अशी झालेली आहे की हे लोक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतात. परतीचे दोर कापले गेलेत की काय असं या लोकांना वाटत आहे’, असा घणाघात अंधारे यांनी केला आहे.

दरम्यान, राज्याचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात शिंदे गटाच्या आमदारांना पाहून विरोधकांनी केलेली ‘आले आले पन्नास खोके’ ही घोषणा गाजत आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक अशी घोषणा बाजी करत असताना शंभूराज देसाई यांनी ‘तुम्हाला हवेत का पन्नास खोके’, असं बोलल्यानंतर सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर आसूड ओढला आहे.

‘ज्या पद्धतीने शंभूराज देसाई म्हणालेत तुम्हाला पन्नास खोके हवे आहेत का ?, याचे तीन अर्थ निघतात पहिला चला घेतले आम्ही काय करणार आहात तुम्ही, दुसरा आपले मतदार आपल्याला पाहत आहेत त्याची तमा या चेहऱ्यावरती नव्हती म्हणजे मतदारांना गृहीत धरण्याची ती कृती होती, आणि तिसरा आणि महत्वाचा अर्थ म्हणजे आम्हाला पन्नास खोके पोहच झाले आहेत याचा तो कबुली जबाब होता” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. तर येणाऱ्या काळात अशा निगरगट्ट लोकांना लोक मतपेटीतून उत्तर देतील असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button