breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रियलेख

नवरात्रारंभ म्हणजेच ‘घटस्थापना : शास्त्र, इतिहास, महत्त्व आणि व्रत करण्याची पद्धत

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

आज, २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी ’ होत आहे. महाईन्यूजच्यावतीने खास नवरात्रौत्सवाचे महात्म्य…

ईश्वर निर्गुण आहे, तर देवता गुणयुक्त आहेत. प्रत्येक देवता ही सत्त्व, रज आणि तम या गुणांनी युक्त असते. वर उल्लेखिल्याप्रमाणे तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण, हे अनुक्रमे महाकाली, महालक्ष्मी अन् महासरस्वती या देवींचे प्रधान गुण आहेत. २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी देशभरात चालू होत असलेल्या ‘नवरात्रारंभा’च्या निमित्ताने नवरात्रीमागील शास्त्र, नवरात्रीचे व्रत साजरे करण्याची पद्धत यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

१. नवरात्रीमागील शास्त्र
‘रात्री’ म्हणजे होत असलेला पालट. देवीचे एक नाव ‘कालरात्री’ असे आहे. ‘कालरात्री’ म्हणजे कालपुरुषात पालट घडवणारी. फिरणे हा पृथ्वीचा गुणधर्म आहे. पृथ्वीच्या फिरण्यामुळे पालट होत असतात, म्हणजे रात्र आणि दिवस होतात. अशा पालटांना सहन करण्याची क्षमता शरिरात असावी म्हणून व्रते करतात.

२. नवरात्रीमागील इतिहास

अ. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे ९ दिवस युद्ध करून देवीने नवमीच्या रात्री त्याला मारले. त्यानंतर तिला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणू लागले.

आ. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर आक्रमण (स्वारी) करून शेवटी रावणाला ठार मारले.

३. नवरात्रीचे महत्त्व
नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या वाढलेल्या देवीतत्त्वाचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करावी.

अ. नवरात्रीच्या काळात देवीची भावपूर्ण आराधना करावी आणि ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करावा. (सर्व देवी या आदिशक्ति श्री दुर्गादेवीचीच रूपे आहेत; म्हणून ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप करण्यास सांगितले आहे.)

आ. या काळात दिवसभरात मध्ये मध्ये श्री दुर्गादेवीला प्रार्थना करावी, ‘हे श्री दुर्गादेवी, नवरात्रोत्सवाच्या काळात नेहमीपेक्षा सहस्रपटींनी कार्यरत असलेल्या तुझ्या तत्त्वाचा मला तुझ्या कृपेने अधिकाधिक लाभ होऊ दे.’

४. व्रत करण्याची पद्धत
या व्रताला पुष्कळ घराण्यांत कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.

अ. घरात पवित्र स्थानी एक वेदी बनवून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवी आणि नवार्ण यंत्र यांची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी.

आ. नवरात्र महोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील चाळलेली मृत्तिका आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (पाच किंवा) सप्तधान्ये घालावीत. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये होत.

इ. मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू, तसेच शुद्ध स्थानावरील थोडी माती, उदा. तुळशीतील माती, घोडे बांधण्याच्या जागेतील माती घालावी.

ई. सप्तधान्ये आणि कलश (वरुण) स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावे. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोचेल अशी बांधावी.

उ. नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते.

ऊ. ‘अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठण (चंडीपाठ), सप्तशती-पाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललितापूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी विविध कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्यानुसार नवरात्र महोत्सव साजरा करावा.
ए. भक्ताला उपवास असला, तरी देवतेला नेहमीप्रमाणे अन्नाचा नैवेद्य दाखवावा लागतो.

ऐ. या काळात उत्कृष्ट आचाराचे एक अंग म्हणून श्मश्रू न करणे (दाढी-मिशीचे आणि डोक्यावरील केस न कापणे), कडक ब्रह्मचर्य, पलंगावर आणि गादीवर न झोपणे, सीमा न उल्लंघणे, पादत्राण न वापरणे अशा विविध गोष्टींचे पालन केले जाते.

ओ. नवरात्रीच्या संख्येवर भर देऊन काही जण शेवटच्या दिवशीही नवरात्र ठेवतात; पण शास्त्राप्रमाणे शेवटच्या दिवशी नवरात्र उठणे आवश्यक आहे. त्या दिवशी समाराधना (भोजनप्रसाद) झाल्यावर वेळ उरल्यास त्याच दिवशी सर्व देव काढून अभिषेक आणि षोडशोपचार पूजा करावी. वेळ नसल्यास दुसर्‍या दिवशी सर्व देवांवर पूजाभिषेक करावा.

औ. देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी पेरलेल्या धान्याची झालेली रोपे देवीला वहातात. त्या रोपांना ‘शाकंभरीदेवी’ म्हणून स्त्रिया डोक्यावर धारण करून विसर्जनाला घेऊन जातात.

अं. नवरात्र बसतांना आणि उठतांना देवांचे ‘उद्वार्जन’ (देवतांच्या मूर्ती स्वच्छ करणे) अवश्य करावे. उद्वार्जनासाठी नेहमीप्रमाणे लिंबू, भस्म इत्यादी वस्तू वापराव्या. रांगोळी किंवा भांडी घासायचे चूर्ण (पावडर) वापरू नये.’

क. शेवटी स्थापित घट आणि देवी यांचे उत्थापन (विसर्जन) करावे.

ख. नवरात्र किंवा इतर धार्मिक विधींत दिवा अखंड तेवत रहाणे, हा पूजाविधीचा भाग असतांना तो वारा, तेल संपणे, काजळी धरणे आदी कारणांमुळे विझल्यास ती कारणे दूर करून दिवा परत पेटवावा आणि प्रायश्चित्त म्हणून अधिष्ठात्या देवतेचा १०८ किंवा १ सहस्र ८ इतका नामजप करावा.

ग. देवीला पुढीलप्रमाणे प्रार्थना करतात – ‘हे देवी, आम्ही शक्तीहीन झालो आहोत, अमर्याद भोग भोगून मायासक्त झालो आहोत. हे माते, तू आम्हाला बळ देणारी हो. तुझ्या शक्तीने आम्ही आसुरी वृत्तींचा नाश करू शकू.’

घ. दुर्गाष्टमी : दुर्गापूजेचा उत्सव बंगाल, बिहार, ओडिशा, आसाम, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधीकाली देवी शक्तीधारणा करत असल्यामुळे ‘संधीपूजा’ नावाची विशेष पूजा या वेळी केली जाते. महाष्टमीला प्रातःकाळी शुचिर्भूत होऊन भगवतीची वस्त्र, शस्त्र, छत्र, चामर आदी राजचिन्हांसहित पूजा करावी. त्या वेळी भद्रावतीयोग असल्यास पूजा संध्याकाळी करावी आणि अर्धरात्रीला बलीप्रदान करावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button