ताज्या घडामोडीमुंबई

पोलीस कोठडीत छळ झाल्याचा नवनीत राणांचा दावा खोटा; चौकशीनंतर गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानी हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी कोठडीत पोलिसांकडून हीन वागणूक मिळाली असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. या आरोपावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘नवनीत राणा यांच्या आरोपानंतर मी याबाबत माहिती घेतली, मात्र असं काही घडलं नसल्याचं समोर आलं आहे. मात्र तरीही आम्ही पुन्हा चौकशी करू,’ अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ खाली दोन समुदायांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तसंच नंतर पोलिसांनी राजद्रोहाचे १२४-अ हे कलमही वाढवले. या प्रकरणात कोर्टाने तात्काळ दिलासा देण्यासाठी नकार दिल्याने राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला. अशातच मी मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी मला प्यायला पाणीही दिलं नाही, असा आरोप करत नवनीत राणा यांनी लोकसभेच्या सभापतींना पत्र लिहिलं.

 

नवनीत राणा यांनी लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, ‘लोकसभा सभापतींनी घडलेल्या घटनेविषयी माहिती मागवली आहे. ही माहिती आम्ही लवकरच त्यांना देऊ.’

दरम्यान, महाराष्ट्रात पोलिसांच्या मदतीने सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. या आरोपावरही गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘पोलीस कायद्यानेच कारवाई करतात. कायद्याच्या बाहेर जाऊन कोणीही निर्णय घेत नाही. आतापर्यंत झालेली कारवाई कायद्यानेच झाली असून ती योग्य आहे,’ असं गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button