breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

‘युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल’; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नाशिक | भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी @२०४७ पर्यंत विकसित भारत घडवित इतिहास निर्माण करावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांनी युवकांची ताकद ओळखली होती. ते युवकांचे प्रेरणास्थान आहेत. भारतीय युवकांचे परिश्रम, सामर्थ्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. याच शक्तीच्या सामर्थ्यावर भारताची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. याच युवकांच्या बळावर भारत मॅन्युफॅक्चरिंगचे हब तयार होत आहे. यातूनच तरुणांना इतिहास घडविण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या पिढीने देशासाठी जीवन अर्पण केले. आताच्या पिढीने पुढील २५ वर्षांचा काळ कर्तव्य काळ मानत विकसित भारताच्या निर्मितीसाठी द्यावा, त्यासाठी युवकांनी संकल्प सोडावा. जेणेकरून भारत जगात नव्या उंचीपर्यंत पोहोचू शकेल. त्यासाठी मेरा भारत- युवा भारत संघटन सुरू करण्यात आले आहे. त्यावर आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त युवक- युवतींनी नोंदणी केली आहे.

हेही वाचा   –    सरकारचा मोठा निणर्य! लक्षद्वीपला जाण्यासाठी फ्लाईट होणार सुरु 

आधुनिक भारत घडविण्यासाठी तरुणांच्या मार्गात येणारे विविध अडथळे दूर करण्यात येत आहे. कौशल्‍य विकासावर आधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात येत आहे. त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. आयआयटी, एनआयटी महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. युवकांमधील कौशल्य विकासासाठी पाश्चात्य देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले असून त्यांचाही लाभ होत आहे. महामार्गांची निर्मिती, वंदे भारत रेल्वे, विमानतळांचाही विकास करण्यात येत आहे. चंद्रयान, आदित्य एल १ च्या यशाने जगाला भुरळ पडली आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने युवकांना नवनवीन संधी दिली आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदान करावे, असेही आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. हाच धागा पकडत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठीतून संवाद साधत अभिवादन केले. ते म्हणाले की, भारतीय नारी शक्तीचे प्रतीक राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी युवा महोत्सवामुळे मिळाली याचा अतिशय आनंद होत आहे. राजमाता जिजाऊ यांना कोटी कोटी वंदन, असे सांगितले. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्राची भूमी ही पुण्य, वीर तपोभूमी आहे. याच भूमीत राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा महानायक घडविला. याच भूमीत अहिल्याबाई होळकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे, रमाबाई आंबेडकर, चाफेकर बंधु, दादासाहेब पोतनीस यांच्या सारखी उत्तुंग व्यक्तिमत्वे घडली, असेही प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.

अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्यानिमित्त आबालवृध्दांनी या कालावधीत मंदिरांसह तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्‍छता मोहीम राबवावी. याचाच एक भाग म्हणून आज सकाळी काळाराम मंदिरात दर्शनानंतर स्वच्छता करण्याची संधी मिळाल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button