breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उद्धव ठाकरे आणि तेलंगण मुख्यमंत्री भेटीवर नारायण राणेंची टीका; म्हणाले “सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके…”

मुंबई |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव रविवारी मुंबईत पोहोचले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याशिवाय राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राव यांनी सध्या भाजपाच्या विरोधात आघाडी उघडली असून, बिगरभाजप आणि काँग्रेस आघाडीचे नेतृत्व करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि पवार यांची त्यांनी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते. दरम्यान त्यांच्या या भेटीवर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे.

नारायण राणे यांनी ट्वीट करत या भेटीवर टीका करताना सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही असा टोला लगावला आहे. तसंच यापुर्वी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ घोषणा देणाऱ्या शिवसेनेने भूमिका बदलण्यावरुनही टीका केली आहे. महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही असं ते म्हणाले आहेत. “सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात शिवसेना पूर्वी एक घोषणा देत होती. हटाव लुंगी, बजाव पुंगी! आता आम्ही (शिवसेना) व तेलंगणा भाऊ भाऊ काय.. अजब परिवर्तन! तुम्ही (तेलंगणा) आम्ही (शिवसेना) भाऊ भाऊ. मिळेल ते मिळून खाऊ!,” असं नारायण राणे म्हणाले आहेत.

“महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही. भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे व भाजपचे ३०१ खासदार आहेत,” अशी आठवण नारायण राणेंनी यावेळी करुन दिली आहे.

महाराष्ट्र आणि तेलंगण या बिगरभाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात रणिशग फुंकले. देशातील वातावरण गढूळ झाले असून, खालच्या पातळीवर सुडाचे राजकारण सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली, तर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

  • फडणवीसांची प्रतिक्रिया

“मी पत्रकार परिषद ऐकली नाही. पण एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री येऊन एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येऊन भेटणे यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असतानाही तेलंगणचे मुख्यमंत्री भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे याच्यात फार काही वाटत नाही,” असं राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. भाजपाच्या विरोधाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल असं यावेळी सांगण्यात आल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “या सगळ्या मंडळींनी मागील लोकसभेतही हातात हात घालून मोठी आघाडी तयार केली. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशासह देशाच्या विविध राज्यांमध्ये त्यांनी हा प्रयोग करुन पाहिला. कुठेही याचा परिणाम झाला नाही”.

“खरं म्हणजे तेलंगणात आता टीआरएसची स्थितीच वाईट आहे. मागील लोकसभेत भाजपाच्या चार जागा निवडून आल्या, पुढील लोकसभेत तेलंगणात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल,” असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “रोज काय होत आहे हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. राणेंवर, त्यांच्या मुलांवर होणारी कारवाई, किरीट सोमय्यांचा कसा जीव घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, रवी राणा या सगळ्या गोष्टी जनता पाहत आहे. सुडाचं राजकारण कोण करत आहे हे माहिती आहे. त्यांची निराशा सुडाच्या राजकारणातू बाहेर येत आहे”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button