breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

चाहत्याच्या कानफटात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल, नाना पाटेकर यांनी मागितली माफी

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये नाना पाटेकर यांनी सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याच्या कानफटात लगावली. यावरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नाना पाटेकर म्हणाले, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मी एका मुलाला मारतोय. हा सीन आमच्या चित्रपटाचाच भाग आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती. त्यात पाठीमागून एक जण म्हणतो ‘ए म्हाताऱ्या टोपी विकायची आहे का?’ मी त्यात टोपी घालून असतो. तो येतो मी त्याला पकडून मारतो आणि ‘नीट वाग, उद्धट बोलून नकोस’ असं म्हणतो. त्यानंतर तो जातो. एक रिहर्सल केली, नंतर दिग्दर्शकाने पुन्हा रिहर्सल करायला सांगितलं. आम्ही सुरू करणार इतक्यात या व्हिडीओत दिसणारा मुलगा तिथे आला. मला माहीत नव्हतं की हा मुलगा कोण आहे, मला वाटलं आमच्या टीममधला आहे. त्यामुळे सीननुसार मी त्याला मारलं आणि माझा डायलॉग म्हटला. नंतर मला कळालं की हा आमच्या टीममधला माणूस नाही. मग मी त्याला बोलवायला जात होतो, पण तो पळून गेला. त्याच्या मित्राने वगैरे हा व्हिडीओ शूट केला असेल.

हेही वाचा – विराटचं शतक! शमीची तुफान खेळी, भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल!

मी कधीच कुणाला फोटोसाठी नाही म्हटलेलं नाही. मी इथेही हजारो फोटो काढले, तिथे वाराणसीत घाटावर खूप गर्दी असते. हे चुकून झालं, मला माहीत नाही तो कुठून आला, मी आमच्या टीमचा माणूस समजून रिहर्सलचा सीन शूट केला. या व्हिडीओमुळे कोणताही गैरसमज झाला असेल तर मला माफ करा, मी असं कधीच कुणाला मारत नाही, आजपर्यंत मी कधीच असं केलेलं नाही. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे मी असं कृत्य कधीच करणार नाही, असं नाना पाटेकर म्हणाले.

मला वाटलं की त्याने उगाच माझा मार खाल्ला, त्यामुळे मी टीमला सांगितलं की त्याला बोलवा मी त्याची माफी मागतो. टीमने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सापडला नाही. तो रिहर्सलच्या मधे शिरला होता, त्यामुळे त्याला वाटलं असेल की हे लोक कदाचित आणखी मारतील, त्यामुळे तो पळून गेला असावा. पण खरंच मला माफ करा मी कधीच असं वागत नाही. घाटावर गर्दी शुटिंग करताना लोक खूप मदत करतात. आम्ही तिथे आणखी १०-१५ दिवस शुटिंग करणार आहोत, असंही नाना पाटेकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button