लोखंडी रॉडने मारून भंगारवेचकाचा खून
पिंपरी चिंचवड | लोखंडी रॉडने मारत एका तरुणाने भंगारवेचकाचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 11) रात्री नऊ वाजताच्या सुमारास चौधरी पार्क, वाकड येथे उघडकीस आली. मयत व्यक्ती आणि आरोपी दोघे एकत्र राहत होते.रवी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी दत्ता लक्ष्मण पटेकर याला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रवी हा भंगार गोळा करण्याचे काम करत होता. मागील काही महिन्यांपासून तो पत्नीपासून विभक्त राहत होता. दरम्यान तो आरोपी दत्ता याच्यासोबत चौधरी पार्क, वाकड येथे राहत होता.
शनिवारी रात्री रस्त्याच्या बाजूला रवीचा मृतदेह सापडल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता रवीला रॉडने मारहाण केल्याचे समोर आले. तसेच, त्याच्यासोबत राहणारा दत्ता हा फरार असल्याचे समजले. पोलिसांनी दत्ताला ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.