Uncategorizedताज्या घडामोडी

कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या गरोदर महिलेची प्रसूती करण्यास नकार; वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेला मध्यरात्री…

नाशिकरोडः कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या गरोदर महिलेची प्रसूती करण्यास नकार मिळाल्याने, या महिलेच्या जीवाशी खेळण्याचा संतापजनक प्रकार पालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात नुकताच घडला. वेदनांनी विव्हळणाऱ्या या गरोदर महिलेला अखेर मध्यरात्रीच्या वेळी नाशिकरोडहून जिल्हा शासकीय रुग्णालय असा प्रवास करण्याची दुर्दैवी वेळ आली. या प्रकाराविषयी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी स्थानिक डॉक्टरांचीच री ओढत जबाबदारी झटकली आणि कोणाकडे तक्रार करायची ती करा, अशी उर्मट भाषा वापरली. या प्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांनी घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी पालिका आयुक्त आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे.

खर्जुल यांच्याकडे सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करणारे थलराज डांगी यांची गरोदर पत्नी मिशरा डांगी यांना २२ जुलै रोजी रात्री ११ वाजता बिटको रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आणि जुळी बाळे असल्याने सिझेरियन करावे लागणार असल्याने, त्यांच्या प्रसूतीस ड्युटीवरील डॉक्टरांनी नकार दिला. डॉ नागरगोजे यांनीही करोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती करण्याची सुविधा पालिका रुग्णालयात नसल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. खर्जुल यांनी या महिलेच्या प्रकृतीबाबत नागरगोजे यांना माहिती देत बिटको रुगणालयातच प्रसूती करण्याची मागणी केली असता, नागरगोजे यांनी उर्मट भाषा वापरल्याचे आणि कोणाकडेही तक्रार करण्याचे आव्हान केल्याचा दावा खर्जुल यांनी केला आहे. ऐनवेळी केलेली करोना चाचणी अहवालदेखील कागदावर लिहून देण्यात आला. विशेष म्हणजे या महिलेची जिल्हा रुग्णालयात सुखरूप प्रसूती झाली.

प्रसूती कक्षाचा थांगपत्ताच नाही

आवश्यक सुविधा असूनही अद्यापही बिटको रुग्णालयात महिलांसाठी प्रसूती कक्ष उभारलेला नाही. ही सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची होती. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने येथे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांचे हाल सुरू आहेत.

प्रसूती दरम्यान एका महिलेला या रुग्णालयात आपला जीव हकनाक गमवावा लागला असून, हे प्रकरण वैद्यकीय विभागाने दडपले आहे. महिलेच्या प्रसूती प्रकरणात कर्तव्यात कसूर करणे, जबाबदारी टाळणे असे प्रकार डॉ. नागरगोजे त्यांच्याकडून केले गेल्याने, त्यांच्यावर पालिका आयुक्तांनी निलंबनाची कारवाई न केल्यास शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन छेडले जाईल.

– जयश्री खर्जुल, माजी नगरसेविका

कोव्हिड पॉझिटिव्ह गरोदर महिलेची प्रसूती करण्याची सुविधा पालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात नसून केवळ जिल्हा शासकीय रुग्णालयातच आहे. कोव्हिड पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती केल्यास त्या ठिकाणी नॉन कोव्हिड महिलांची प्रसूती करता येणार नाही, म्हणून दोन वर्षांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय झालेला आहे. मनुष्यबळ आणि आणि जागेची अडचण दूर झाल्यावर पालिकेच्या रुग्णालयांत देखील ही सुविधा दिली जाईल. प्रसूती दरम्यान महिलेचा झालेला मृत्यू दडविण्यात आलेला नाही.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी, मनपा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button