बदली आदेश : राज्य प्रशासनात मोठ्या प्रमाणावर IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
विविध पदांवर नवे नियुक्त अधिकारी
मुंबई : राज्य शासनाने १७ जुलै २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर प्रशासनिक फेरबदल करत २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये विविध महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, महत्त्वाच्या महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ सचिव पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बदल्यांमध्ये एम.एम. सूर्यवंशी यांची वसई-विरार महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती, तर दीपा मुधोळ-मुंडे यांची समाज कल्याण आयुक्त, पुणे या पदावर नियुक्ती झाली आहे. नीलेश गटणे हे आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सतीशकुमार खडके यांची नियुक्ती झाली असून, यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले नीलेश गटणे यांची पर्यटन विकास महामंडळात बदली झाली आहे.
अनिलकुमार पवार यांची नियुक्ती MMRSRA ठाणेचे सीईओ म्हणून झाली आहे. तसेच शभालचंद्र चव्हाण यांची मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा : नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल; विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
नवोदित IAS अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्या बदली आदेशात दुरुस्ती करण्यात आली असून, आता ते गोडपिंप्री (चंद्रपूर) व धारणी (अमरावती) येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत राहतील.
विजयसिंह देशमुख, विजय भाकरे, त्रिगुण कुलकर्णी, गजानन पाटील यांच्यासह अनेक अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नत होऊन विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहेत.
प्रमुख बदल्यांचे संक्षिप्त रूप:
एम.एम. सूर्यवंशी – आयुक्त, वसई-विरार महापालिका
दीपा मुधोळ-मुंडे – आयुक्त, समाज कल्याण, पुणे
नीलेश गटणे – व्यवस्थापकीय संचालक, पर्यटन विकास महामंडळ
सतीशकुमार खडके – मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे
अनिलकुमार पवार – सीईओ, MMRSRA, ठाणे
पंकज देवरे – व्यवस्थापकीय संचालक, PMPML, पुणे
महेश पाटील – आयुक्त, आदिवासी संशोधन संस्था, पुणे
राजलक्ष्मी शाह – व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई
गजेंद्र बावणे – आयुक्त, भू-सर्वेक्षण विकास संस्था, पुणे
प्रतिभा इंगळे – आयुक्त, अल्पसंख्याक विकास, संभाजीनगर
या बदल्यांमुळे राज्य प्रशासनात नवे नेतृत्व पुढे येणार असून, विविध विभागांमध्ये कार्यक्षमतेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या सर्व अधिकाऱ्यांकडून त्यांच्या नवीन कार्यक्षेत्रात प्रभावी कामगिरी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.





