दप्तराचे ओझे कमी होणार; सर्व धडे ‘एकात्मिक पुस्तक’
मुंबई | राज्य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न आधीदेखील केला आहे. मात्र आता सर्व शाळांमध्ये पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. ‘एकात्मिक पुस्तक’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यात वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये लवकरच पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येतील, अशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचे ओझे कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यामुळे आता लवकरच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पातील विभागवार मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. त्या विधानसभेत बोलताना म्हणाल्या की, ‘सरकारी शाळेतील मुलांना इंग्रजीचे चांगले ज्ञान व्हावे यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. त्यात मराठी शब्दांना इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्दही असतील. त्यामुळे एकाच वेळी मुलांना वेगवेगळ्या शब्दांचा, संज्ञांचा परिचय होईल. त्यांचे इंग्रजी चांगले होण्यास मदत होईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.





