राज ठाकरेंचा मोठा निर्णय; मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी ‘या’ व्यक्तीची केली निवड

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईत पार पडलेल्या मनसे नेत्यांच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
त्यानुसार, मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर देण्यात आली आहे. मुंबईतील विभाग अध्यक्षांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी मुंबई अध्यक्षावर असणार आहे.
मनसेने आतापर्यंत मुंबईसाठी कधीही अध्यक्षांची नेमणूक केली नव्हती. आता थेट पहिल्यांदाच मुंबई अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर मुंबईसाठीही अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे.
हेही वाचा – Online Gaming वर सर्जिकल स्ट्राईक; 357 वेबसाईट ब्लॉक, पालकांचा जीव भांड्यात
याशिवाय मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर गट अध्यक्षांच्या कामाचा आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मनसे शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन सरदेसाई विभाग अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेतील.
मनसेच्या मुंबई शहराध्यक्षांसह तीन उपाध्यक्ष काम करणार आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता या जबाबदारी देण्यात आल्या आहेत.