Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

To The Point: माजी महापौर मंगला कदम यांचा दावा अन्‌ योगेश बहल यांची ‘‘विकेट’’

विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता पूर्णत: धुसर : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अपशकुन!

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्थानिक आणि बाहेरचा (गाववाले आणि बाहेरुन शहरात स्थायिक झालेले) असे गट आहेत. त्यामध्ये माजी महापौर योगेश बहल आणि टीमचा गट (बाहेरचा) दिवंगत अजित पवार यांच्या ‘गुड बॉक्स’ मधील म्हणून ओळखला जात होता. गेल्या २५-३० वर्षांत बहल यांनी राष्ट्रवादीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णायक भूमिका ठेवली. आजही योगेश बहल शहर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत.

माजी महापौर योगेश बहल आणि मंगला कदम दोघेही मातब्बर नेते आहेत. एका अर्थाने दोघेही बाहेरचे. त्यामुळे राजकीय कारकीर्दीमध्ये स्थानिकांशी त्यांचे कधीही सूर जुळले नाही. किंबहुना, स्थानिकांमध्ये फूट पाडून राजकीय यश मिळवण्याचा यशस्वी प्रयोग या दोन्ही नेत्यांनी केला. त्याबाबत अनेकदा राजकीय वर्तुळात जाहीर चर्चाही झाली. बहल-कदम यांनी राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कारकीर्द गाजवली.

योगेश बहल यांनी कायम स्थानिकांमधील मतभेदांचा फायदा करुन घेतला. राजकारणात त्यामध्ये गैर काहीच नाही. पूर्वी मंगला कदम, शेट्टी कुटुंबीय, आसवाणी कुटुंबीय आणि आता सीमा सावळे, आशा शेंडगे अशा स्थानिक विरोधकांना सोबत घेवून बहल आजही शहराच्या राजकारणात प्रभावी दिसतात. मात्र, स्थानिकांचा ‘सपोर्ट’ नसल्यामुळे केवळ नगरसेवक आणि महापालिकेतील महत्त्वाची पदे यापर्यंतच त्यांना मजल मारता आली.

काही दिवसांपूर्वी योगेश बहल यांना विधान परिषदेवर संधी मिळावी. याकरिता सीमा सावळे यांच्या नेतृत्त्वात शहरातील एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना भेटले. मात्र, या जागेवर इशान सिद्धीकी यांना संधी देण्यात आली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याचा कार्यक्रम जाहीर झाला. १८ जून रोजी मतदान होईल. या निवडणुकीत पुन्हा बहल यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा असतानाच माजी महापौर मंगला कदम यांच्या एका वक्तव्याने बहलांची अक्षरश: राजकीय ‘‘विकेट’’ घेतली.

मंगला कदम सत्य बोलून गेल्या अन्‌…

प्रभाग क्रमांक ११ मधील एका उद्यानाच्या आरक्षणावर मंगला कदम यांच्या आशिर्वादाने समाजमंदिराचे काम अनधिकृतपणे सुरू आहे. त्याला भाजपाच्या स्थानिक नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी विरोध केला. यावर संतापलेल्या कदम यांनी थेट आमदार महेश लांडगे यांना जाब विचारला. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण, कदम बोलताना एक सत्य बोलून गेल्या… ते असे की, ‘‘मी विलास लांडे यांना पाडण्यासाठी १५ वर्षे तुमचे काम केले.’’ आता कदम यांनी १५ वर्षांपासून पक्षविरोधी काम केले का? असा प्रश्न सोशल मीडियातून जाहीरपणे उपस्थित केला जात आहे. याचा दुसरा अर्थ ज्यावेळी राष्ट्रवादीकडे निर्विवाद सत्ता होती. त्यावेळीच महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीचा एक गट हाताशी धरला होता. त्याचा फायदा त्यांना सलग तीनवेळा विधानसभा निवडणुकीत झाला. आता लांडगे यांना पक्षाची नगरसेविका आणि राष्ट्रवादीतील मदतगार यांच्या वादातून मार्ग काढावा लागणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

बहल-कदम अन्‌ विलास लांडे संघर्ष…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेनंतर शहरातील मातब्बर नेते माजी आमदार विलास लांडे विरुद्ध योगेश बहल-मंगला कदम हा पक्षांतर्गत राजकीय सत्तासंघर्ष सर्वश्रृत आहे. २००४ मध्ये लांडे यांनी हवेली मतदार संघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर २००९ मध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातून मंगला कदम यांना तिकीट दिले. त्यावेळी लांडे यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक जिंकले. त्यामुळे बहल-कदम यांच्या मनात लांडेप्रति बदल्याची भावना निर्माण झाली. या भावनेतून २०१४ च्या निवडणूक बहल-कदम गटाने अपक्ष निवडणूक लढवलेल्या महेश लांडगे यांना मदत केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर विलास लांडे निवडणुकीच्या रिंगणात होते. लांडगे विजयी झाले आणि बहल-कदम गटाचा बदला पूर्ण झाला. राष्ट्रवादीत असताना पक्षाच्या उमेदवाराविरोधात त्यांनी काम केले. नंतरच्या काळात त्यांनी भाजपासोबत जुळवून घेतले, असे सांगितले जाते. त्याची परिणीती २०२६ च्या महापालिका निवडणुकीत पहायला मिळाली. मंगला कदम यांचा मुलगा कुशाग्र कदम यांना आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भाजपा प्रवेश देण्यात आला आणि ते निवडून आले. लांडगे यांनी कदम कुटुंबियांनी केलेल्या मदतीची एकप्रकारे परतफेड केली.

आता नाना काटे, विलास लांडे ‘डार्क हॉर्स’…

पुणे स्थानिक स्वराज्य विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली. या जागेवर शहरातील नेत्याला संधी द्यावी आणि २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने पक्ष भक्कम करावा, अशी अपेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. बहल आणि कदम यांनी पक्षातील प्रतिस्पर्धांचा बंदोबस्त करण्यासाठी विरोधी पक्षातील उमेदवारांना साथ दिली. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. ही बाब सातत्त्याने स्थानिकांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता मंगला कदम यांच्या विधानामुळे यावर प्रकाश पडला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बहल यांना विधान परिषदेव संधी मिळेल, याची शक्यता मावळली. किंबहुना, राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे आणि माजी आमदार विलास लांडे यांचे पारडे जड झाले आहे.

हेही वाचा: भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button