एम एस धोनी आज अखेरचा सामना खेळणार? CSK vs SRH सामन्यानंतर मोठ्या घोषणेची शक्यता!

MS Dhoni | ‘कॅप्टन कुल’ महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आयपीएल २०२६ च्या मोसमात पोटरीच्या दुखापतीमुळे एकदाही मैदानावर न उतरलेला धोनी आज, १८ मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार का? याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणारा हा सामना या हंगामातील चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) घरच्या मैदानानावरील अखेरचा सामना आहे. याच पार्श्वभूमीवर धोनीचे २०२१ मधील एक जुने वक्तव्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
२०२१ मध्ये धोनी काय म्हणाला होता?
पाच वर्षांपूर्वी (२०२१ मध्ये) सीएसकेच्या एका कार्यक्रमात बोलताना धोनीने आपल्या निवृत्तीच्या योजनेबाबत मोठा खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, “मी नेहमीच एका योजनेनुसार क्रिकेट खेळतो. मी माझा शेवटचा एकदिवसीय (ODI) सामना रांचीमधील माझ्या घरच्या मैदानावर खेळलो होतो. आता हे पुढील वर्षी होईल की पाच वर्षांनी हे मला माहीत नाही, पण मला माझा शेवटचा टी-२० सामना चेन्नईमध्येच खेळायचा आहे.”
धोनीने हे वक्तव्य करून आता बरोबर पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. योगायोग म्हणजे आज चेन्नईचा या मोसमातील चेपॉकवरील हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे धोनी आज मैदानात उतरून क्रिकेटला अलविदा करणार का, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा
श्रीमंत दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन दर्जा, राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोहम्मद कैफचे मोठे भाकीत
या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी धोनी चेपॉक स्टेडियमवर नेट्समध्ये जोरदार सराव करताना दिसला. विशेष म्हणजे, कोणत्याही फिजिओशिवाय त्याने स्वतः व्यायाम करत फलंदाजीचा सराव केला. या बदलत्या घडामोडी त्याच्या पुनरागमनाचे आणि सोबतच निवृत्तीच्या निर्णयाचे संकेत देत आहेत.
दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि धोनीचा सहकारी मोहम्मद कैफ यानेही यावर मोठे भाकीत केले आहे. कैफ एका मुलाखतीत म्हणाला, “१८ मे रोजी चेन्नईमध्ये होणारा सामना धोनीचा अखेरचा सामना असू शकतो. तो या सामन्यात नक्की खेळेल अशी मला आशा आहे आणि हा सामना खेळून तो आपली निवृत्ती जाहीर करेल.”





