मुंबईत पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे, रस्त्यांची दैना
खड्ड्यांची आकडेवारी समोर १०४ कोटींचा अपेक्षित खर्च

मुंबई : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शहरात रस्त्यांची दैना झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे असताना सध्या शहरात फक्त १७९ खड्डे बाकी असल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागाने दिली आहे.
काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात महापालिकेकडे खड्ड्यांच्या १,१३७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ९५८ खड्डे पालिकेच्या पथकाने भरल्याचा दावा पालिकेने केला आहे, तर तक्रारींपैकी केवळ १७९ खड्डे शिल्लक असून, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर हे खड्डे बुजवण्यात येणार आहेत.
दरम्यान, मुंबईत १,२०० किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. यामुळे यंदा तुलनेने खड्ड्यांच्या तक्रारी कमी आहेत. प्रभाग स्तरावर पथके तैनात ठेवण्यात आली असून, तातडीने खड्डे भरण्यात येत असल्याचे रस्ते विभागाचे मुख्य अभियंता गिरीश निकम यांनी सांगितले.
हेही वाचा – टीकेनंतरही फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, पण उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “रुदाली…”
१०४ कोटींचा अपेक्षित खर्च
मुंबई महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी हॉट मिक्स, कोल्ड मिक्स, जिओ पॉलिमर अशा विविध पर्यायांची चाचपणी केली होती. यंदा मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच मास्टिक अस्फाल्ट म्हणजेच डांबरानेच खड्डे बुजवले जात आहेत. तसेच पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी खर्चाची तरतूद केली आहे. यंदा सात परिमंडळातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी ७९ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे, तर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
शिल्लक कामे पावसाळ्यानंतर
मुंबईत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत, तर शिल्लक कामे पावसाळ्यानंतर वेगात पूर्ण केली जातील. कामे शिल्लक असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबई पालिकेला सुमारे दीडशे किमी लांबीच्या रस्त्यावरील खड्डेच बुजवावे लागणार आहेत. त्यामुळे अंदाजे खर्चात ५१ टक्के कपात आहे. गेल्या वर्षी खड्ड्यांसाठी १५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.