रखडलेल्या झोपु योजना म्हाडा पूर्ण करणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या रखडलेल्या योजना खासगी विकासकांकडून काढून घेत त्या आता म्हाडा पूर्ण करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. म्हाडा विकासकाच्या भूमिकेतून या योजना मार्गी लावणार असून म्हाडाला विक्री योग्य घरे बांधून ती विकण्याची मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रखडलेल्या योजनेतील झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे हा विकासकांसाठी दणका मानला जातो आहे. उपमुख्यमंत्र्यांनी बुधवारी म्हाडा भवनात गृहनिर्माण विभागातील विविध यंत्रणांच्या कामाचा आढावा घेतला. झोपु प्राधिकरण, म्हाडा आणि धारावी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा यात समावेश होता.
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपु प्राधिकरणाकडून झोपु योजना राबविल्या जात आहेत. मात्र यातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. या पार्श्वभूमीवर झोपु प्राधिकरणाने रखडलेले प्रकल्प शोधून काढले असून असे ३८० प्रकल्प आहेत. हे प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रकल्प विकासकांकडून काढून घेत म्हाडाच्या माध्यमातून प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. टप्प्याटप्प्यात हे प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ६८ प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार आहे. अर्धवट स्थितीत असलेले आणि २० ते ४० टक्के पूर्ण होऊन बंद असलेले असे प्रकल्प पहिल्या टप्प्यात घेण्यात आले आहेत. पुनर्वसन घटक पूर्ण करत म्हाडाला विक्री घटकातील घरांची विक्री करता येणार आहे. या विक्रीतून म्हाडाला प्रकल्पासाठीचा खर्च वसूल करता येणार आहे. दरम्यान या ६८ प्रकल्पांतील रहिवाशांना घरभाडे देण्याची जबाबदारी झोपु प्राधिकरणावर असणार आहे.





