Naman Tula Song : अमृता फडणवीसांचे ‘नमन तुला’ गाणे प्रदर्शित, ‘या’ अभिनेत्याच्या एन्ट्रीने वेधलं लक्ष; नेटकरी म्हणाले….

Amruta Fadnavis Maharashtra Din Special Song : आज १ मे, म्हणजेच ‘महाराष्ट्र दिन’. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं ‘नमन तुला’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारं हे गाणं आहे. महत्त्वाचं म्हणजे या गाण्यात बॉलीवूड व मराठी सिनेविश्वावर आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्याने कॅमिओ केला आहे. सध्या ‘नमन तुला’ या गाण्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळतेय.
‘नमन तुला’ हे गाणं अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. त्याचबरोबर त्यांनी या गाण्यात नृत्यही केले आहे. या गाण्याचे संगीतकार अनु मलिक असून गीतकार चैतन्य कुलकर्णी आहेत. गाण्याचं दिग्दर्शन शक्ती हसिजा यांनी केलं आहे. ४ मिनिटं २१ सेकंदांच्या या गाण्यात शेवटी एक खास कॅमिओ आहे. तो इतर कुणी नसून ‘राजा शिवाजी’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता रितेश देशमुख आहे.
हेही वाचा – राज्यात सात जिल्ह्यांत आज ‘एमआरआय’ सेवेचे लोकार्पण
दरम्यान, या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले, त्यांचा इतिहास याचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देत त्यांना मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला आहे. या गाण्यावर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांना हे गाणं आवडलं आहे, तर काहींनी मात्र अमृता फडणवीसांनी सिनेमाच्या गाण्याप्रमाणे यावर नृत्य केल्याने नाराजीच्या कमेंट्स केल्या आहेत.
१ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याची मागणी होत होती. त्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ उभी राहिली आणि अखेर १९६० मध्ये तत्कालीन बॉम्बे स्टेटचे विभाजन होऊन मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचा गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी झालेल्या आंदोलनात १०६ आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून मुंबईतील ‘हुतात्मा चौक’ (फ्लोरा फाउंटन) येथे त्यांना अभिवादन केले जाते.





