मुंबई

मावळातील चिमुकलीला न्याय द्या – आमदार शेळके यांची विधानसभेत मागणी

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी । 

मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात एका ७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना २ ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेतील मुलीला त्वरित न्याय मिळावा यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी गुरुवारी (दि.१८) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मावळातील चिमुकलीला न्याय देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू करा व गावा-गावांतील अवैध धंदे बंद करा,अशी मागणी केली आहे.

या संदर्भात आमदार शेळके हे विधिमंडळात बोलताना म्हणाले की, मावळातील कोथुर्णे गावात माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली.या घटनेतील चिमुकलीला जर न्याय द्यायचा असेल तर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात
चालवावा व त्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी.तसेच आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी.व पीडित कुटुंबास न्याय द्यावा अशी मागणी केली.

या दुर्दैवी घटनेमागचे कारण गावा – गावात सुरू असलेले दारू धंदे देखील आहेत. या दारू धंद्यानी अनेकांची कुटुंबं उध्वस्त झाली आहेत आणि तरी देखील गावात दारू धंदे सुरू राहत असतील तर ते दुर्दैव आहे.
आपण देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना गावा गावांमध्ये लाईट पाणी यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. मात्र प्रत्येक गावात दारू धंदे आहेत. जर या दुर्दैवी घटनेतील चिमुकलीला न्याय द्यायचा असेल तर गावा-गावांतील अवैध दारू धंदे पण बंद करावेत,अशी मागणी आमदार शेळके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

अनेक सामाजिक संस्था व दानशुरांनी पिडीत कुटुंबास आर्थिक मदत केली. मात्र या घटनेला पंधरा दिवस उलटुन देखील सरकारने अद्यापपर्यंत कोणतीही मदत केलेली नाही. पण मुख्यमंत्री लवकरच मदत करणार असल्याचे सोशल मीडियावर पाहिले. मात्र ती मदत लवकर कधी होणार, असा सवाल आमदार सुनिल शेळके यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

आमदार शेळके यांच्या वक्तव्य नंतर आमदार अदिती तटकरे यांनी देखील याबाबत वक्तव्य करत शासनाकडून या कुटुंबास महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत होणे गरजेचे होते. तसेच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा,अन्यथा पीडित कुटुंबावर नैराश्य येते.असे सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button