सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबईकरांचा खोळंबा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेची मुंबईकडे येणारी लोकल सेवा सध्या १० ते २० मिनिटं उशिरानं सुरू आहे. वैतरणा-विरार दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल उशिराने धावत आहे.
दोन दिवसांपूर्वी ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आज पुन्हा तांत्रिक बाबींमुळे मुंबईतील लोकल सेवेला फटका बसला आहे. दरम्यान, अंधेरी पूर्व-पश्चिमला जोडणारा गोखले पुल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने रविवारी मध्यरात्रीपासून हा पूल बंद केल्यानं नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा हा पूल आहे. हा पूल धोकादायक असल्याचं पत्र मुंबई महापालिकेनं वाहतूक पोलिसांना दिलं होतं. कॅप्टन गोरे ब्रीज, मिलन सबवे, ठाकरे उड्डाणपूल, अंधेरी सबवे आणि खार सबवे या मार्गांवर या परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे.





