Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेतून जलसंवर्धनाचा व्यापक संदेश’; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ उपक्रमाअंतर्गत ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या जलयात्रेतून जलसंवर्धनाचा व्यापक संदेश सर्वदूर पोहोचवण्याचा संकल्प असल्याची माहिती जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विचार, वारसा आणि विकास’ या त्रिसूत्रीवर आधारित ही जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लोकसहभाग आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे हा या जलयात्रेचा मुख्य उद्देश आहे.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या दूरदर्शी व लोकाभिमुख कारभारातून प्रेरणा घेत राज्यात पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. तसेच त्यांनी केलेली मंदिरांची पुनर्बांधणी, घाट-बारव उभारणी, लघुसिंचन आणि जलसंवर्धनाच्या कामांमधील त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या यात्रेतून दृढ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान श्रीक्षेत्र चोंडी आणि गोदावरीचे उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून एकाच वेळी या दोन ठिकाणांहून २५ एप्रिल २०२६ रोजी जलयात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून, या कार्यक्रमास आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या निमित्त १०८ कन्यांचे पूजन, गोदामातेचे पूजन तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा –  वसुंधरा दिनानिमित्त ‘वसुंधरा रक्षक अभियान’ व ‘महा-आरपीईटी’ अभियानाचा शुभारंभ

श्रीक्षेत्र चोंडी येथील कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. २५ एप्रिल रोजी चोंडी येथून निघणारी यात्रा अहिल्यानगर येथे मुक्काम करेल, तर त्र्यंबकेश्वर येथून निघणारी यात्रा नाशिक, सिन्नर आणि संगमनेर मार्गे २६ एप्रिल रोजी शिर्डी येथे एकत्र येईल. त्यानंतर एकत्रितपणे यात्रा पुढे मार्गस्थ होईल.

शिर्डी येथे यात्रेच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली असून, ‘द फोक आख्यान’सह विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि जलप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानंतर २७ एप्रिल रोजी शिर्डी, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर मार्गे छत्रपती संभाजीनगर व घृष्णेश्वर येथे मुक्काम होईल. २८ एप्रिल रोजी यात्रा कन्नड, चाळीसगाव मार्गे धुळे येथे पोहोचेल. पुढे २९ एप्रिल रोजी धुळे ते महेश्वर (मध्य प्रदेश) असा प्रवास करून या जलयात्रेचा समारोप होईल.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील ३० नदीखोऱ्यांतील पाणी कलशांच्या माध्यमातून या उपक्रमात सहभाग नोंदविण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात येईल आणि हे सर्व कलश शिर्डी येथे एकत्रित करण्यात येतील. जलसंपदा विभागाकडून प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रेत सुमारे ५०० जलयात्री, वारकरी आणि युवक सहभागी होणार असून, पाणी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, सेवाभावी संघटना, शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित झाल्यामुळे महिलांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

जलसंवर्धन ही काळाची गरज असून सामूहिक प्रयत्नांतूनच राज्याचा जलसंपदा विकास अधिक सक्षम होऊ शकतो, असे सांगत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जलयात्रेत राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button