‘अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे’; एकनाथ शिंदे

मुंबई : मोगल बादशहा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्यांच्यात व छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती. उलट त्यांच्याच काळात भारताला सोन्याची खाण म्हणून संबोधले जात होते, असा वादग्रस्त दावा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला आहे. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमींवर जोरदार टीका केली. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे अतिशय दुर्दैवी आहे. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. औरंगजेबाने 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून मारले. या देशासाठी ज्यांनी धर्माभिमान बाळगला, देशासाठी प्राणाचे बलिदान दिले. परंतु, त्यांनी धर्म, राष्ट्राभिमान सोडला नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. जेवढा याचा निषेध करू, तेवढा कमी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. अबू आझमींनी केलेले औरंगजेबाचे कौतूक म्हणजे महापाप आहे. अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा – मुळशी धरणातून पाणी मिळण्यासाठी शासन आग्रही
अबू आझमींनी म्हटले की, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी ‘सोने की चिड़िया’, असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही.
अबू आझमी म्हणाले की, मी दररोज सकाळी पाहतो की मुस्लिमांना अपमानित करण्यासाठी, त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी कट रचले जातात. बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार दिसत आहे. पण देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हे मुस्लिमांवर होणारा अन्याय पाहू शकत नाहीत का? जर समाजातील 20 टक्के लोकांसोबत हे घडत असेल तर ते अजिबात बरोबर नाही. जर तुम्ही त्यांना आरक्षण दिले नाही, त्यांना रोजगार दिला नाही तर ते कुठे जातील? ते हिंदू सणांमध्ये वस्तू विकतात म्हणून तुम्ही म्हणता की ते दारू विकतात. हे चुकीचे आहे. द्वेषाची ही परंपरा थांबवा.