ब्रिटनहून येणाऱ्या सर्व हवाई वाहतुकिंना ‘नो एन्ट्री’
कोरोना विषाणूच्या नव्या संसर्गामुळे भारत सरकारचा निर्णय
पिंपरी | टीम ऑनलाईन
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने सगळेच देश सतर्क झाले आहेत. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेतलि आहे. ब्रिटनहून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर भारताने तात्पुरती बंदी घातली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे हे पाऊल भारताने उचलले आहे. ही बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागून होणार आहे.
ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विमान वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता केंद्र सरकारनेही भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घातली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे होते, त्या सर्व गोष्टी सरकारने केल्या आहेत.
इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे.





