पीएमसी बँकेच्या प्रशासकपदी ए. के. दीक्षित यांची नियुक्ती
मुंबई – पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे नवे प्रशासक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युनियन बँकेचे माजी महाव्यवस्थापक ए. के. दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. या बँकेबाबत ते नेमका तोडगा काढतील, या अपेक्षेने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
आरबीआयने यापूर्वी पीएमसी बँकेचे प्रशासक म्हणून जे. बी. भोरीया यांची नियुक्ती केली होती. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना ही जबाबदारी पार पाडणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या जागी दीक्षित यांची नवे प्रशासक म्हणून आरबीआयने नियुक्ती केली आहे. मोठा आर्थिक तोटा झाल्यामुळे अडचणीत आलेल्या पीएमसी बँकेला त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि बँकेचे लाखो ठेवीदार व गुंतवणूकदार यांना दिलासा देण्यासाठी आरबीआय सतत प्रयत्न करत आहे. त्यासाठी आतापर्यंत आलेल्या विविध पर्यायांवर आरबीआयने विचार केला. या बँकेची थकीत कर्जे वसूल करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. असे असताना यावर नेमका तोडगा काढला जावा यासाठी दीक्षित यांची नवे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या वर्षी २३ सप्टेंबर रोजी आरबीआयने भोरीया यांची पीएमसी बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.





