ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत घरविक्री कमी, तरीही महसुलात वाढ

मुंबई | करोनाचा फटका बसलेला बांधकाम व्यवसाय आता बऱ्यापैकी वधारत असल्याची बाब दिसून येत आहे. घरविक्रीची नोंदणी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली असली तरी महसूलात मात्र चांगली वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्कात सवलत असल्यामुळे घरविक्री वधारली. पण यंदा घरविक्री कमी झाली असली तरी महसुलात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बांधकाम व्यवसायासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

‘नाइट फ्रँक’ने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीअखेरीस दहा हजार १७२ घरांची विक्री झाली होती. यंदा फेब्रुवारीअखेरीस नऊ हजार ८०५ घरविक्रीची नोंद झाली. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्कात कपात करण्यात आल्यामुळे घरविक्रीत वाढ झाल्याचे बोलले जात होते. यंदा मुद्रांक शुल्कात कुठलीही कपात नसताना फेब्रुवारी २०२१ च्या तुलनेत चार टक्के कमी घरविक्री झाली असली तरी राज्याच्या तिजोरीत ५४९ कोटींचा महसूल मिळाला. गेल्या वर्षी घरविक्री वाढूनही महसूल मात्र ३५२ कोटी मिळाला होता. यंदाच्या जानेवारी महिन्यात आठ हजार १५५ घरांची विक्री होऊन ४७८ कोटींचा महसूल राज्याला मिळाला. गेल्या वर्षी जानेवारीत १० हजार ४१२ अशी घरविक्रीची नोंद होऊनही फक्त ३०५ कोटी मिळाले होते. याचा अर्थ एकच आहे की, मुंबईत आता घरविक्रीला पुन्हा वेग मिळाला आहे. कुठलीही सवलत नसताना घरखरेदीदारांमध्ये वाढ होत आहे. हा खरा ग्राहक आहे. गृहकर्जावरील कमी व्याजदराचा हा फायदा असू शकतो, असे नाइट फ्रँकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले.

‘झोपडपट्टी पुनर्वसन योजनांतील खुल्या विक्रीला चांगला प्रतिसाद’ शासनाकडून वेळोवेळी मिळालेली सवलत तसेच इतर घटकांमुळे आता ग्राहकांचाही विश्वास दुणावला आहे. घरविक्रीला पुन्हा चांगले दिवस आले आहेत, असे पोदार हौसिंग अँड डेव्हलपमेंटचे व्यवस्थापकीय संचालक रोहित पोदार यांनी सांगितले. शासनाकडून मिळालेल्या सवलती व गृहकर्जावरील व्याजदरात झालेली लक्षणीय कपात ही प्रमुख कारणे असून त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांतील खुल्या विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा एन रोझ डेव्हलपर्सचे गौरव पुरोहित यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button