मुंबई: मुंबईच्या कांदिवली परिसरातील एका बैठ्या चाळीत घर कोसळून चार वर्षांच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत अन्य चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कांदिवली पश्चिमेला असणाऱ्या उत्तर भारतीय सेवा संघ चाळीत शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याठिकाणी गटारासाठी खड्डा खणण्याचे काम सुरु होते. जेसीबीच्या साहाय्याने याठिकाणी खोदकाम सुरु होते. हा भाग चाळीला अगदी खेटूनच आहे. खोदकाम सुरु असतानाच चाळीतील दुमजली घर कोसळले. या घरातील सर्वजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. स्थानिकांनी लगेच बचावकार्याला सुरुवात केली. अग्शिनमन दलानेही याठिकाणी येत ढिगारा उपसून घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले. ही दुर्घटना घडली तेव्हा घरात दोन महिला आणि दोन लहान मुलं होती. या सगळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. यापैकी एका चार वर्षीय मुलाचा उपचारादरम्याम मृत्यू झाला आहे.
ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावरुन आता राजकारणही रंगण्याची शक्यता आहे. सध्या कांदिवली पोलीस या संपूर्ण प्रकरणी अधिक तपास करत आहेत.या भागातील स्थानिक नगरसेवक कमलेश यादव यांनी पालिकेला या घटनेसाठी जबाबदार धरत त्यांच्यावर आरोप केला आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा कमलेश यादव यांनी केला.