breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

दिल्ली कॅपिटल्स संघाची बलाढ्य मुंबई इंडियन्स संघावर चार गडी आणि दहा चेंडू राखून मात

मुंबई |

आयपीएल स्पर्धा सर्वात जास्त वेळा जिंकणाऱ्या (5 वेळा) मुंबई इंडियन्सची सुरुवात बऱ्याचदा खराब असते त्याचाच प्रत्यय आजच्या त्यांच्या पहिल्या आणि या मोसमातल्या दुसऱ्या सामन्यात आज सर्वांना पुन्हा एकदा आला आणि जिंकता जिंकता मुंबई इंडियन्स संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. आज दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नानेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,पण हा निर्णय चुकीचा ठरला असे वाटावे अशी आक्रमक सुरुवात कर्णधार रोहित आणि युवा आक्रमक फलंदाज ईशान किशनने केली. ईशान किशनला मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा संघात घेताना कोटीच्या कोटी खर्च केले आहेत,ते का याचे उत्तर आज त्याने आपल्या बॅटनेत्याने दिले असावे.या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 50 चेंडूत 67 धावा चोपल्या.

दोघेही जबरदस्त खेळत होते, ही जोडी दिल्ली संघाची डोकेदुखी वाढवत असतानाच जम बसलेल्या रोहीतला कुलदीप यादवने वैयक्तिक 41 धावांवर बाद करून आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिले. रोहीतने 32 चेंडूत चार चौकार आणि दोन उत्तुंग षटकार मारत या धावा काढल्या.यानंतर खेळायला आलेल्या या अनमोलप्रीत सिंग फक्त आठ धावा काढून कुलदीपच्याच गोलंदाजीवर बाद झाला. यावेळी मुंबई संघाची धावसंख्या दोन बाद 83 होती, त्यानंतर आलेल्या टिलक वर्मा या 19 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने आयपीएल मध्ये पदार्पण करताना आपल्या पहिल्याच सामन्यात चांगली फलंदाजी करताना 15 चेंडूत22 धावा काढताना बऱ्यापैकी आशा दाखवली, पण त्याला खलील अहमदने बाद करून त्याची खेळी समाप्त केली. त्यानंतर अगदी काहीच चेंडू खेळून कायरन पोलार्ड हा अनुभवी फलंदाजही फक्त तीन धावा करुन स्वस्तात बाद झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ अडचणीत आला होता. 16 व्या षटकाच्या अखेरीस मुंबईची अवस्था चार बाद 122 अशी कठीण झालेली होती.

मात्र याचवेळी ईशान किशनने सर्व दडपण झुगारून जबरदस्त फलंदाजी करताना सामन्याचे चित्रच बदलून टाकले,त्याने केवळ 48 चेंडूत दोन षटकार आणि अकरा चौकार मारत नाबाद 81 धावा करत संघाला 177 धावांची चांगली आणि सन्मानजनक धावसंख्याही गाठून दिली.याचदरम्यान त्याने आयपीएल मधले आपले वैयक्तिक दहावे अर्धशतकही पूर्ण केले. त्याला टीम डेविड (12) आणि सॅम्सने 7 धावा करत बऱ्यापैकी साथ दिली. दिल्ली कॅपिटल संघाकडून कुलदीप यादवने सुंदर गोलंदाजी करताना केवळ 20 धावा देत तीन महत्वपूर्ण बळी प्राप्त केले,त्याला खलील अहमदने 27 धावा देत दोन गडी बाद करून बऱ्यापैकी साथ दिली,अनुभवी शार्दुल ठाकूर आज खूप महागडा ठरला.

उत्तरादाखल खेळताना दिल्ली संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. पृथ्वी शॉ आणि टीम सायफर्टने पहिल्या गड्यासाठी केवळ 30 धावा नोंदल्या असताना टीम वैयक्तिक 21 धावा काढून मुर्गन अश्विनच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला,तर याच षटकात मनदीप सिंग भोपळाही न फोडता तिलक वर्माच्या हातात झेल देऊन बाद झाला. हा धक्का दिल्ली कॅपिटल्स संघ पचवतोय न पचवतोय तोच कर्णधार ऋषभ पंत मिल्सच्या गोलंदाजीवर एक खराब फटका मारून बाद झाला अन मुंबई संघाने एकच जल्लोष केला. कधीही कोणत्याही परिस्थितीत सामना एकहाती बदलून टाकण्याची ताकत असलेल्या पंतला या मानाच्या ओळखीबरोबरच अत्यंत बेभरवशाचा म्हणूनही ओळखले जावे हा खरोखरच दैवदुर्विलासच आहे.यावेळी दिल्ली कॅपिटल्सची अवस्था 5 व्या षटकाच्या अखेरीस तीन बाद 32 अशी बिकट झालेली होती.त्यामुळे दिल्ली संघ चांगलाच अडचणीत आला होता.

यानंतर पृथ्वी शॉ आणि ललित यादव यांनी चौथ्या गड्यासाठी 37 धावांची भागीदारी करत डावाला सावरण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण बऱ्यापैकी खेळत असलेल्या पृथ्वीला वैयक्तिक 38 धावांवर असताना बासील थंपीने चकवले आणि तो ईशान किशनच्या हातात झेल देवून तंबुत परतला, याच षटकात थंपीने रोवमन पॉवेलचा बळी मिळवत दिल्ली संघाला पूर्णपणे अडचणीत टाकले.पॉवेल तर भोपळाही फोडू शकला नाही. दहाव्या षटकात दिल्ली संघाची अवस्था पाच बाद 72 अशी कठीण झाली होती. त्यानंतर आलेल्या शार्दूल ठाकूरने थोडीफार फटकेबाजी करत चार चौकारासह अकरा चेंडूत 22 धावा केल्या पण तोही फार वेळ टिकू शकला नाही आणि दिल्ली संघाच्या डोळ्यासमोर पराभव स्पष्टपणे दिसायला लागला.मात्र हा खेळच असा आहे की आपल्याला जसे वाटते तसे इथे मुळीच होत नाही.इथेही तसेच झाले, अक्षरशः चमत्कार झाला आणि तो केला कुणी? नवखा ललित यादव आणि अक्षर पटेल या जोडीने,त्यांच्या तुफानी फटकेबाजीपुढे चतुरस्त्र कर्णधार म्हणून ओळखला जाणारा रोहितही भांबावला. त्याला आपल्या बुमराह या अस्त्राचाही विसर पडला आणि त्या चुकीचा जबरदस्त फायदा उठवत या जोडीने मुंबई इंडियन्सच्या शब्दशः घशातून काढून दिल्लीच्या हातात आणून दिला.

या जोडीने सातव्या गड्यासाठी 75 धावांची अभेद्य विजयी भागीदारी करून संघाला विजयी केले.ललित यादव 38 चेंडूत 48 धावा करून तर अक्षर पटेल केवळ 17 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार मारत 38 धावांवर नाबाद राहिले.या विजयासह दिल्ली संघाने या मोसमातले आपले विजयी अभियान अगदी थाटात सुरू केले आहे,तर मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात नेहमीप्रमाणे अडखळती झाली आहे. ललित यादव दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

  • संक्षिप्त धावफलक –  

मुंबई इंडियन्स – 20 षटकात 5 बाद 177, ईशान नाबाद 81,रोहीत 41, तिलक 22, कुलदीप यादव 20/3,खलील 27/2

दिल्ली कॅपिटल्स – 18.2 षटकात 6/179, पृथ्वी शॉ 38,ठाकूर 22, ललित यादव 48 नाबाद, अक्षर 38 नाबाद
थंपी 35/3,मुर्गन अश्विन 14/2

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button