ताज्या घडामोडीपुणे

‘मोहनदादा, आधी पुणेकरांसाठी घराबाहेर तर पडा’ : महापौर मोहोळ

पुणे | ‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर पुणेकरांमधून अडीच वर्षे गायब झालेले मोहन जोशी पुन्हा चर्चेत येण्यासाठी वाट्टेल ते बोलतात. पुणेकरांनी नाकारूनही जनता सोबत असलेल्या भाजपवर आणि नेत्यांवर काहीही बोलतात. पुणेकर संकटात असताना आम्ही न डगमगता पुणेकरांच्या सेवेत होतो, तेव्हा मोहन जोशी घरात बसले होते. त्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या मोहन जोशींनी आधी पुणेकरांच्या मदतीसाठी घराबाहेर पडावे’, असे खरमरीत उत्तर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेस नेते मोहन जोशी यांना दिले.सिरमचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी पुणे शहराला विशेष प्रमाणात लस देण्यासाठी केंद्राने परवानगी दिली नसल्याचा दावा नुकताच केला होता. त्याचाच आधार घेऊन काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी पुणे भाजपवर निशाणा साधत, ‘पूनावाला यांचे ऐकूण भाजपचे नेते हलतील का?’ असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर पुणे शहराला लस मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणाऱ्या महापौर मोहोळ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

‘मोहन जोशींनी आधी पुणेकरांसाठी घराबाहेर तर पडावे, असा खरमरीत टोला हाणून महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘मोहन जोशी यांना पुणेकर तर सोडाच पण पुणे काँग्रेसमधील नेतेही गांभीर्याने घेत नाहीत. मोहन जोशी शहरातील ज्येष्ठ नेते असले तरी त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी आणि पुणेकरांच्या विस्मरणात जावू नये, म्हणून आरोप करु नयेत. पुणेकर ज्यावेळी कोरोना संकटाचा सामना करत होता; ऑक्सिजन, बेड्स, रुग्णवाहिका आणि रेमडेसिविर मिळवण्यासाठी सर्वानाच संघर्ष करावा लागत होता, तेव्हापासून मोहन जोशी यांनी ‘वर्क फॉर्म होम’ हीच पद्धत अवलंबली आहे. जी आजतागायत सुरु आहे. संकटात पुणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या जोशींनी लोकसभा संपल्यानंतर पुणेकरांकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, ही वस्तुस्थिती पुणेकर जाणतात’.

‘पुणेकरांना अधिकची लस मिळावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, जे अजूनही सुरु आहेत. सिरम इन्स्टिट्यूट पुण्यात असल्याने आपण अधिकच्या डोसची मागणी करत आहोत. सायरस पूनावाला यांनी ‘सिरम’च्या माध्यमातून केंद्र सरकारला पुण्यासाठी अधिकच्या लस देता येईल का? या संदर्भात पत्र लिहिले, ते पत्रही आमच्या विनंतीवरुन लिहिले होते. याची कल्पनाही जोशी यांना नाही. केंद्र सरकारचे लस वितरणाचे धोरण संपूर्ण देशासाठी लागू असल्याने पुण्यासाठी म्हणजेच थेट महापालिकेला लस देण्याचा निर्णय घेण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. ही वस्तुस्थिती जोशी यांना ज्ञात असूनही ते राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रकाराला पुणेकर थारा देणार नाहीत, हा विश्वास आहे. शिवाय केंद्र सरकार हे राज्य सरकारला लशींचा पुरवठा करते. मग मोहन जोशी यांनी राज्य सरकारकडे पुण्यासाठी अधिकच्या लशींची मागणी केल्याचे, ऐकिवात नाही,’ असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

‘सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी ही खरे तर राज्य सरकारची जबाबदारी असते. मात्र यात आम्ही अजिबातही राजकारण केले नाही. राज्य सरकारने एक रुपयांचाही निधी किंवा आरोग्य सुविधा महापालिकेला दिल्या नाहीत. आज पुणेकरांसाठी खोटा कळवळा दाखवणारे जोशी यांनी त्यांचा पक्ष सहभागी आलेल्या महाविकास आघाडीकडे मदतीसाठी तोंड का नाही उघडले?, असा सवालही महापौर मोहोळ यांनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button