breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

‘मनसे ताकदीने मोहोळ यांचा प्रचार करणार’; मनसे नेते अमित ठाकरे यांचा विश्वास

मोहोळ यांनी घेतली सदिच्छा भेट

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराच्या हालचालींनाही वेग आला आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे सक्रीय होणार आहे. यासंदर्भात मोहोळ यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली असून ‘पुण्यातही मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने आणि जोमाने मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभे राहतील, प्रचारात सक्रिय होतील,’ असा विश्वास मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मोहोळ यांना दिला.

मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर कार्यालयात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. याप्रसंगी मोहोळ यांना शुभेच्छा देत अमित ठाकरे यांनीही मनसेची संपूर्ण पुणे शहर संघटना आपल्या प्रचारात सक्रिय असेल, असा विश्वास दिला. यावेळी मनसेच्या वतीने ठाकरे यांनी मोहोळ यांचा सत्कार केला. या भेटीनंतर मोहोळ आणि मनसेचे सरचिटणीस बाबू वागसकर यांनी संयुक्तरित्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – राजकीय कारस्थानामुळे दुखावलेले नितीन लांडगे राष्ट्रवादीच्या प्रचारापासून दुरावले! 

या वेळी मनसेचे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस बाळा शेडगे, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या भेटीबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘मनसेचे नेते अमितजी ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असताना मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे मताधिक्य वाढवण्यास मोठा हातभार लावतील, असा शब्द दिला. त्यांच्याशी प्रचाराच्या रणनीतीबाबतही चर्चा झाली. त्यामुळे आमचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. विजय आणखी सोपा झाला आहे. राजसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आणि मनसेची स्वतंत्र ताकद संपूर्ण पुणे शहरात आहे. त्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. साहजिकच आम्ही सर्वच पक्ष एकदिलाने काम करून मोठा विजय साकारू’.

मनसे सरचिटणीस वागसकर म्हणाले, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नुकताच महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आमचे नेते अमितजी ठाकरे सर्वच शहरांत जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी आज पुण्यातही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी, सर्व संघटकांशी चर्चा केली. त्यांनी आम्हा सर्वांना सोबत घेऊन, सन्मानाने वागणूक देऊन महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आम्ही एकदिलाने त्यांच्या प्रचारात सहभागी होणार आहोत’.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button