breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

राजकीय कारस्थानामुळे दुखावलेले नितीन लांडगे राष्ट्रवादीच्या प्रचारापासून दुरावले! 

ग्राऊंड रिपोर्ट : शिरुरमध्ये अजित पवार अन्‌ आढळराव पाटलांना फटका

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढली असली तरी, शिरुर लोकसभा मतदार संघातील ‘निर्णायक’ असलेला भोसरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे ‘गणित’ अद्याप जुळलेले नाही. विशेष म्हणजे, भोसरी-पिंपरी-चिंचवडसह हवेली तालुक्यातील राजकारणातील मातब्बर घराणे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे आणि त्यांचे राजकीय वारसदार माजी स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे या निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रचार करतील काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

ज्ञानेश्‍वर लांडगे हे पिंपरी-चिंचवडचे पहिले महापौर. त्यांनी काँग्रेसकडून आमदारपदही भूषवले आहे. पूर्वीच्या हवेली मतदारसंघातून ते निवडून आले होते. शहराच्या राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते. शिक्षण क्षेत्रात नर्सरी ते इंजिनिअरिंग कॉलेज अशा नऊ शैक्षणिक संस्था असलेल्या पिंपरी एज्युकेशन ट्रस्टचेते अध्यक्ष आहेत. पवना सहकारी बॅंकेचेही अध्यक्ष असून, ४५ वर्षापासून ते या बॅंकेशी निगडित आहेत. त्यांचा राजकीय वारसा पुत्र ॲड. नितीन लांडगे हे पुढे चालवीत आहेत. 

पूर्वी राष्ट्रवादीत असलेले ॲड. नितीन लांडगे यांनी भोसरीतील भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात महापालिका निवडणुकीची (2017) भाजपात जाहीरपणे प्रवेश केला. महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपाच्या माध्यमातून ॲड. लांडगे यांना स्थायी समिती सभापतीपदी संधी देण्यात आली. त्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते.

दरम्यान, स्थायी समितीच्या कार्यालयाबाहेर लाचप्रकरणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात ॲड. लांडगे यांच्यावर प्रचंड आरोप झाले. तत्कालीन राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि स्थानिक नेत्यांनी या मुद्याचे राजकीय भांडवल केले. पिंपरी-चिंचवडमधील मातब्बर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घराणे असलेल्या लांडगे कुटुंबियांवर झालेले आरोप, ॲड. नितीन लांडगे यांना झालेली अटक आणि मिळालेली पोलीस कोठडी तसेच राष्ट्रवादीने उचललेला संधीचा फायदा… या सर्व बाबी ज्ञानेश्वर लांडगे कुटुंबियांच्या जिव्हारी लागल्या आहेत. 

ज्ञानेश्वर लांडगे कुटुंबीय तटस्थ राहणार…

लाच प्रकरणात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केलेला संधीसाधुपणा ॲड. नितीन लांडगे आणि कुटुंबीय विसरणार नाहीत. पिंपरी-चिंचवडसह पंचक्रोशीमध्ये व्रतस्थ व्यक्तीमत्व म्हणून माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचा उल्लेख केला जातो. सुमारे ५० वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ही ‘लीगसी’ लांडगे कुटुंबीयांनी जपली. पण, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या आततायीपणामुळे याला गालबोट लागले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करुन ‘ कथित लाच प्रकरण’ चव्हाट्यावर आणले. त्यामुळे भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील लांडगे कुटुंबियांशी आत्मियता असलेला वर्ग नाराज झाला होता. मोठ्या शिक्षण संस्था आणि पवना बँकेच्या माध्यमातून तसेच नातेगोत्यामुळे भोसरी, खेडसह ग्रामीण भागात लांडगे यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे भोसरीसह शिरुर लोकसभा मतदार संघातील राजकारणात ज्ञानेश्वर लांडगे कुटुंबियांची भूमिका ‘निर्णायक’ ठरणार आहे. लांडगे कुटुंब या निवडणुकीत राष्ट्रवादीपासून अलिप्त राहिल्यास महायुतीला फटका बसणार आहे. 

शरद पवार- ज्ञानेश्वर लांडगे यांची भेट होणार… 

राज्यातील राजकारणात अजित पवार आणि भाजपाचा बंदोबस्त करण्यासाठी मैदानात उतरलेले मातब्बर नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधकांची मोट बांधण्याची रणनिती आखली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची साथ दिली आहे. त्यामुळे शिरुरमध्ये ‘तुतारी’चा विजयी निनाद करण्यासाठी शरद पवार आपले पत्ते उघडणार आहेत. आगामी आठवडाभरात शरद पवार हे स्वत: माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या भेटीसाठी भोसरीत येणार आहेत. शिरुरच्या विजयासाठी भोसरीतून आगेकूच करण्याचा निर्धार करण्यात आला आहे, असे शरद पवार गटातील विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या अडचणींमध्ये भर पडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button