breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे ‘सक्रिय’, विभागाध्यक्षांना आणि शाखाध्यक्षांना २९ कलमी कार्यक्रमाची सूचना

मुंबई : आगामी मुंबई व अन्य महापालिका निवडणुकांसाठी मनसेने सर्व विभागाध्यक्षांना पक्षांतर्गात त्रुटी दूर करण्यासह आपल्या विभागात स्पाय टीम आणि सोशल मीडियाची टीम त्वरित सक्रिय करण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्व विभागाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांना २९ कलमी कार्यक्रम राबविण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याअंतर्गत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांवर लक्ष केंद्रित करतानाच इतर धर्मांची माहिती गोळा करण्यास सांगण्यात आल्याचे कळते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, मनसेनेसुद्धा रणशिंग फुंकले आहे. एकीकडे पक्षांतर्गत बैठकींचा जोर वाढलेला असतानाच, दुसरीकडे सर्व विभागाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांना विभागात २९ कलमी कार्यक्रम राबविण्याची सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात पक्षांतर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यास सांगतानाच प्रामुख्याने इतर पक्षांतील अंतर्गत माहिती गोळा करण्यासाठी स्पाय टीम आणि आपल्या पक्षाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया टीम कार्यान्वित करण्यास सांगण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीनुसार संभाव्य उमेदवारांची माहिती देण्याचेही सूचित करण्यात आले आहे, तर मुंबईत अनेक ठिकाणी वॉर्डाची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार नव्याने तयार झालेल्या वॉर्डात पदाधिकारी नेमण्याची सूचना करण्यात आली आहे.

दरम्यान, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातूनही अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. यानुसार इच्छुकांचा ताबडतोब पक्षप्रवेश देण्यासह अन्य पक्षांतील नाराजांना वळविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय सध्या विभागातील नगरसेवकांनी न केलेल्या कामांची, त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आणि मागील वचननाम्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली असली तरी निवडणुकीकरिता प्रतिष्ठित, सुशिक्षित उमेदवारांची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. पक्षात तरुण नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. त्यामुळे अशा उमेदवारांची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • ‘मंडळांवर लक्ष केंद्रित करा’

    आगामी निवडणुका लक्षात घेता विभागातील गणशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे आणि गोविंदा पथकांची माहिती गोळा करण्यासह त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क वाढविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याशिवाय जैन देरासर यांचे मंदिर आणि समितीप्रमुख, जैन टॉवर येथील अध्यक्ष, सचिव आणि बौद्धजन पंचायत समितीची माहिती गोळा करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे कळते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button