breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

चिंचवडमध्ये भाजपचा जल्लोष; शक्तीप्रदर्शनात आमदार जगताप भरणार अर्ज

पिंपरी |महाईन्यूज|

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे भाजपच्या वतीने मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. १) जोरदार स्वागत केले. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला. तसेच आमदार जगताप यांना सुमारे २ लाखांच्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, आमदार जगताप हे गुरूवारी (दि. ३) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी भाजपच्या वतीने संपूर्ण मतदारसंघात रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.    

आमदार लक्ष्मण जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडणूक लढविणार आहेत. या मतदारसंघातील मतदारांनी यापूर्वी दोनवेळा त्यांना भरघोस मतांनी विधानसभेत पाठविले. आता ते हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असून, त्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मतदारसंघात ठिकठिकाणी फटाके वाजवून व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. गेल्या १५ वर्षांत मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आमदार जगताप यांना यंदा सुमारे २ लाखांच्या मतदाधिक्याने निवडून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.  

भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार जगताप यांच्या पिंपळेगुरवमधील जनसंपर्क कार्यालयात जाऊन पेढे भरवत त्यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक सागर आंगोळकर, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभुवन, संदिप कस्पटे, नगरसेविका उषा मुंढे, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, राज तापकीर, शिवाजी कदम, धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, संतोष कलाटे, नवीन लायगुडे, मनीष कुलकर्णी, निलेश जगताप, राम वाकडकर, अमर भुमकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप हे गुरूवारी (दि. ३) भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हा अर्ज सादर करणार आहेत. तत्पूर्वी भाजपकडून संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात रॅली काढण्यात येणार आहे. पिंपळेगुरव येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात सकाळी ९ वाजता दर्शन घेऊन या रॅलीला सुरूवात केली जाणार आहे. या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button