TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

बालकांच्या लसीकरणासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम

आयुक्त शेखर सिंह यांची माहिती : दि.७ ते १२ ऑगस्ट दरम्यान लसीकरण

पिंपरी: शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत असून पहिला टप्पा दि. ७ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत राबविला जाणार आहे. या मोहिमेत सहभाग घेऊन बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

केंद्र शासनाने ऑगस्ट २०२३ पासून ३ फेऱ्यांमध्ये सर्व जिल्हे व महानगरपालिकांमध्ये ‘’विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०” कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने पिंपरी चिंचवड शहरात लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन केले असून महापालिकेच्या सर्व रुग्णालय आणि दवाखान्यांत सोमवार दि. ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान ही सुविधा उपलब्ध केली आहे. विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहीम तीन फेऱ्यांमध्ये होणार असून यामध्ये पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर तर तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. यामध्ये आपल्या घराजवळील महानगरपालिकेच्या रुग्णालय किंवा दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून बालकांचे मोफत लसीकरण पुर्ण करुन घेऊन मोहीम यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे म्हणाल्या, बालकांचे मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यु पावतात, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. अशा मृत्युंचे आणि आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रुबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. बालकांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी त्यांचे वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने दि. १० ते १५ जुलै या कालावधीत महापालिकेतील आरोग्य वैद्यकिय अधिकारी, पी.एच.एन, सिनिअर एएनएम, एएनएम व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण घेतले आहे. दि. १७ ते २२ जुलै या कालावधीत क्षेत्रिय आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन लसीकरणापासुन वंचित राहिलेल्या बालकांची माहिती घेतली आहे. त्यानुसार ० ते १ वर्षातील, १ ते २ वर्षातील आणि २ ते ५ वर्षातील लाभार्थी बालकांची आकडेवारी अनुक्रमे ३०९३, १५०१, ९९६ असून गरोदर मातांची संख्या ४६३ इतकी आहे.
बालकांचे लसीकरण पुर्ण करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ३६२ विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच प्रत्येक बालकाचे डिजीटल एमपीसी कार्ड तयार केले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी दिली आहे.

लसीकरणासंदर्भात महापालिकेच्या वतीने नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये बालकाला लसीकरणासाठी घेऊन येताना लसीकरण कार्ड आणि एक फोटो व ओळखपत्र सोबत ठेवावे, बालकाला किरकोळ सर्दी किंवा ताप असल्यास लसीकरण करता येते, लसीकरणानंतर बालकाला ताप आल्यास चिंता करू नये, असे झाल्यास १ ते २ दिवसांत बालकाचा ताप बरा होतो आणि आरोग्य सेविकांकडून त्यासाठी औषधही देण्यात येते, बाळाचे लसीकरण झाल्यानंतर ३० मिनीटे तेथेच थांबा आणि आवश्यक असल्यास आई बाळाला स्तनपान करू शकते, लसीकरणानंतर बाळाची काळजी कशी घ्यावी, याबाबत आरोग्य सेविकेला विचारू शकता, लसीकरण कार्ड सुरक्षित ठेवा आणि पुढील लसीकरणासाठी तारीख नोंदवून ठेवावी अशा सूचनांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button