नामदेवराव जाधवांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं

पुणे : नामदेवराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षण प्रकरणी टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव यांना काळं फासलं आहे.
नामदेव जाधव भांडारकर इन्स्टिट्यूट इथं कार्यक्रमासाठी जाताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याचं सांगितलं जात आहे. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांच्या दाखवल्यावर कुणबी नोंद असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याचा रोष व्यक्त करत पुण्यात नामदेव जाधवांना काळं फासलं.
हेही वाचा – ७० वर्षे आमचं झालेलं नुकसान सरकार कसं भरून काढणार? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल
नामदेवराव जाधवांनी शरद पवार यांच्यावर काय आरोप केला होता?
शरद पवारांनी तेली आणि माळी जातींचा ओबीसींमध्ये समावेश केला. आमची त्याला काही हरकत नाही. पण मग त्यांचं शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण का पाहिलं गेलं नाही? शरद पवार मुख्यमंत्री असताना जे काही घडलं त्याच्या चौकशीसाठी श्वेतपत्रिका काढावी. २३ मार्च १९९४ हा मराठ्यांसाठी काळा दिवस ठरला आहे. याचं महत्त्वाचं कारण त्याच दिवशी शरद पवारांनी रातोरात १८१ क्रमांक खोडून इतर दोन जातींचा समावेश ओबीसींमध्ये केला. डेस्क ऑफिसरच्या सहीने दोन जाती ओबीसींमध्ये घेतल्या गेल्या. त्यांना तातडीने १४ टक्के आरक्षणही दिलं गेलं आणि त्यानंतर नोकरभरतीही झाली. ओबीसींच्या यादीत तेली आणि माळी समाज घेतल्यानंतर २३ मार्च १९९४ पासून आत्तापर्यंत ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यावर मराठ्यांच्या मुलांचा हक्क होता. आज मराठ्यांची लाखो मुलं बेरोजगार आहेत त्याला कारण हा रातोरात झालेला हा निर्णय आहे. या निर्णयाला शरद पवार जबाबदार आहेत कारण ते मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला आहे, असं नामदेवराव जाधव म्हणाले.