ताज्या घडामोडीपुणे

उष्णतेच्या लाटेचे देशात ‘त्राहि माम’, विदर्भासाठी हवामान विभागाचा इशारा

पुणे | महाराष्ट्रासह मध्य, वायव्य आणि उत्तर भारताच्या अनेक  भागांत गुरुवारी तीव्र उष्णतेच्या लाटेने कहर केल्याचे दिसून आले. देशातील ३६ पैकी १८ हवामानशास्त्रीय उपविभागांमधील तब्बल ७६ केंद्रांवर गुरुवारी ४३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदले गेल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) सांगण्यात आले.

देशात गुरुवारी सर्वाधिक तापमान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ४५.९ अंश सेल्सिअस; तर राज्यात चंद्रपूर येथे ४५.८ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि राजस्थानच्या पश्चिम भागांत अनेक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट सक्रिय असून, त्या भागांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदले जात आहे. गुजरात, राजस्थानच्या वाळवंटी भागांतून उष्ण आणि कोरडे वारे उत्तर भारतासह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून देशाच्या मोठ्या भूप्रदेशात सध्या कमाल तापमान चाळीस अंशांच्या वर नोंदले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोरड्या हवेमुळे मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची ही स्थिती आणखी किमान पाच दिवस राहण्याची शक्यता असून, राज्यात मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात पुढील दोन दिवसांत काहीशी घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.

उष्णतेच्या लाटेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता असून, शारीरिक श्रमाच्या कामांसाठी दुपारची वेळ टाळावी, सूर्यप्रकाशात फिरणे टाळावे, नियमितपणे पाणी प्यावे, असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील शहरे

शहर कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

पुणे ४१.८

नगर ४४.५

जळगाव ४५.६

नाशिक ४१.१

सातारा ४१.२

सोलापूर ४३.४

औरंगाबाद ४२.४

परभणी ४३.८

नांदेड ४२.८

अकोला ४५.४

अमरावती ४४.४

बुलडाणा ४२.३

चंद्रपूर ४५.८

नागपूर ४४.३

वर्धा ४५.१

मुंबई ३५.२

रत्नागिरी ३४.५

डहाणू ३६.७

अलिबाग ३५.१

मान्सूनचे आगमन वेळेआधी?

देशाच्या अनेक भागांत उष्णतेच्या लाटेने कहर केलेला असतानाच, हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या विस्तारित अंदाजातून दिलासादायक बातमी आली आहे. मान्सूनचे अंदामांमधील आगमन वेळेत होण्याची शक्यता या अंदाजात वर्तवण्यात आली असून, मे अखेरीस म्हणजे सर्वसाधारण वेळेच्या आधी केरळ आणि पश्चिम किनारपट्टीवर पावसात वाढ होण्याची शक्यता या अंदाजातून वर्तवण्यात आली आहे. मात्र, केरळमधील मान्सूनच्या आगमनाबाबतचे नेमके चित्र पुढील आठवड्यात समजू शकेल, असे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. एम. राजीवन यांनी सांगितले आहे.

खान्देशावर कहर

सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांनी रणरणत्या उन्हाचे चटके सोसले. भरदुपारी आग ओकणाऱ्या सूर्याने रस्ते भट्टीसारखे तापले होते. यामुळे नागरिकांना बाहेर पडणेही अवघड झाले. नाशिक, मालेगावचे तापमान गुरुवारीही चाळिशीपार होते. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाचा सामना खान्देशाने अनुभवला. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांचे तापमान ४५ अंशांवर होते. नाशिकचे तापमान ४१.१, तर मालेगावचे तापमान ४३.४ नोंदवले गेले.

धुळे/नंदुरबार/जळगाव : धुळे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यात उन्हाचा कहर दिसून आला. तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेले. त्यामुळे नंदुरबार, नवापूर खांडबारा, विसरवाडी येथील बाजारपेठेत देखील शुकशुकाट दिसून आला. जळगावात गुरुवारी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button