breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठा आरक्षणसंदर्भात संभाजी छत्रपती यांचं सर्वपक्षीय खासदारांना पत्र

मुंबई : मराठा आरक्षणसंदर्भात क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय खासदारांना पत्र लिहलं आहे. लोकसभा आणि खासदारांची दिल्ली येथे एकत्रित बैठक आयोजित केली आहे.

संभाजीराजे यांनी पत्रात काय म्हटलं?

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून संघर्ष करत आहे. यासाठी अनेक भव्य मोर्चे, आंदोलने, उपोषणे झालेली आहे. काही युवकांनी यासाठी आत्महत्या सारखा टोकाचा मार्ग निवडला. समाजाच्या भावना तीव्र आहेत. तरीही मराठा समाजाने आपली मागणी अतिशय शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने पुढे आणलेली आहे. मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद देवून २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने तर २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदेशीर पातळीवर हे आरक्षण टिकले नाही. मी स्वतः २००७ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात सातत्याने जनजागृती करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवत काही आंदोलने स्वतः देखील केली आहे.

हेही वाचा  –  ‘मनोज जरांगे पाटलांनी राजकीय पक्ष काढावा’; गुणरत्न सदावर्ते 

राज्यसभा सदस्य असताना सभागृहात देखील हा विषय सविस्तर पणे मांडला होता. तसेच संसद परिसरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धरणे आंदोलन ही केले होते. मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करत महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा समाजाचे लाखो युवक हे देखील आंदोलनात सहभाग घेत आहेत. या पार्श्वभूमीवर माझी आपणास कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उचलणे आवश्यक आहे. या विषयी लवकरच नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदारांनी एकत्रित मराठा आरक्षण मिळवण्याबाबत ठोस भूमिका ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीचे सविस्तर निमंत्रण मी लवकरच आपणास पाठवेल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत आणि समाजाला न्याय मिळावा हि विनंती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button