TOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मावळात लोकसभला राष्ट्रवादीचा उमेदवार दीड लाख मताधिक्याने निवडून येईल

मावळ लोकसभा राष्ट्रवादीने लढवावी यावर आमदार शेळके ठाम

महायुतीतील धुसफूस मिटेना, खासदार बारणेंचे टेन्शन कायम

तळेगाव दाभाडेः

आगामी लोकसभेला मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे गटाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. त्यानंतर ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला (अजित पवार) मिळावी म्हणून या पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दावा ठोकला. तो त्यांनी शनिवारी (ता.३) कायम ठेवल्याने बारणेंचे टेन्शन वाढलेलेच आहे. यामुळे ही जागा महायुतीत शिवसेना की राष्ट्रवादी नक्की कोण लढणार हा तर्कवितर्क कायम राहिलाच नसून, उलट तो वाढला आहे. मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटलीच पाहिजे, याचा पुनरुच्चार शेळकेंनी याप्रसंगी केला. ती का मिळावी याचा लेखाजोगा त्यांनी आपल्या पक्षासह भाजप आणि शिंदे शिवसेना यांनाही दिल्याचे सांगितले. ही जागा मिळाली, तर तेथून राष्ट्रवादीचा उमेदवार दीड लाखाच्या लीडने निवडून येईल, असा दावा त्यांनी केला. गेल्या महिन्यात सूप वाजलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मावळसाठी किती निधी आणला याची माहिती देण्यासाठी आमदार शेळके यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मावळसाठी दोन हजार चारशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून, त्यातील बाराशे कोटींची सुरु झाल्याची माहिती दिली.

खासदार बारणेंसोबत वैर नाही, फक्त तिसऱ्यांदा उमेदवारी मागताना केलेल्या कामाचा अहवाल द्यावा

त्याचवेळी युतीचा जो कोणी उमेदवार येथे असेल, मग ते बारणे असोत, त्याचे पक्षाच्या आदेशानुसार काम करू, असेही ते म्हणाले. खा. बारणेंशी आपले वैर नसून फक्त तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यासाठी त्यांनी आपल्या कामाचा अहवाल द्यावा, एवढेच आपले म्हणणे आहे, असे आमदार सुनील शेळके यांनी  स्पष्ट केले. मी खरंच कामे केली की नुसती आश्वासने दिली हे तपासण्यासाठी गेल्या चार वर्षातील आपल्या कामाचा अहवाल पुढील महिन्यात आपण घरोघरी देणार असल्याचे त्यांनी सांगत विरोधकांच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळच्या संभाव्य आरोपांतील हवा आठ महिने अगोदरच काढून घेतली.

कामगार मंत्र्यांना घरचा आहेर

राज्यात भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजित पवार गट सत्तेत असले, तरी मावळात ते एकत्र दिसत नाहीत, त्यातही भाजपचे नेते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीत, असे विचारले असता शेळकेंनी नाव न घेता त्यांच्या नुकत्याच तळेगावात झालेल्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेल्या विरोधकांना टोला लगावला. त्यांच्याकडे राज्य स्तरावरील मोठ्या जबाबदाऱ्या असल्याने ते मावळातील कार्यक्रमाला हजेरी लावत नसावेत, असे ते म्हणाले. मात्र, आता त्यांच्या सोईने मी पुढील कार्यक्रम घेईल,असे ते उपरोधाने म्हणाले. जनरल मोटर्सची लढाई हरल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यासाठी कामगार मंत्र्य़ाचे सहकार्य मिळाले नसल्याचा घरचा आहेर त्यांनी दिला.

राष्ट्रवादीचा उमेदवार दीड लाख मतांनी जिंकेलः सुनील शेळके

मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीलाच सोडली पाहिजे. आणि राष्ट्रवादीला जागा का सोडावी याचा लेखा-जोखा देखील मी भाजप-शिवसेना व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेला आहे. मावळमध्ये राष्ट्रवादीला संधी दिली तर मावळचा उमेदवार सव्वा ते दीड लाखांचे मताधिक्य घेईल, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवूनच काम करावे लागते; अन्यथा मावळची जनता जागा दाखवते

मावळात काम करत असताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवूनच काम करावे लागते. अन्यथा मावळची जनता त्यांना त्यांची जागा दाखवतो असा टोलादेखील शेळके यांनी लगावला.

मागे बोलणाऱ्यांनी आमसभेत येऊन खुले बोलावे

माझ्या कार्यकाळात तालुक्यात झालेल्या विकासकामांबाबत काही शंका, प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील तर 15 फेब्रुवारीला होणाऱ्या आमसभेत या. पाठीमागून चुकीची चर्चा करण्यापेक्षा आमसभेत येऊन खुले विचारा, सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला मी समर्थ आहे, असे थेट आव्हान आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत केले.

काही जणांकडून जनतेची दिशाभूल

तालुक्त कोट्यवधी रुपये निधीच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू असून, काही महत्त्वाचे प्रकल्पही सुरू आहेत. असे असताना काहीजण विनाकारण पाठीमागे चुकीची चर्चा करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्यांनी मागून बोलण्यापेक्षा थेट आमसभेत येऊन खुले बोलावे, असे आव्हान आमदार शेळके यांनी यावेळी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button