breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एसटी चालक-वाहकांच्या बदल्या रोखणार

संपात सामील झाल्याने साडेतीन हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई

अघोषित संपात सामील झाल्याने एसटीतील तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या तीन हजार ४७२ चालक-वाहकांवर कारवाई म्हणून त्यांच्या बदल्या रोखण्यात येणार आहेत.

चालक-वाहकांवरील या कारवाईबाबत एसटी महामंडळाकडून धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच तसे आदेशही काढले जातील. याप्रकरणी एसटी महामंडळ आणि कामगार संघटनांमध्ये पुन्हा वादाची शक्यता आहे.

वेतनवाढीच्या मागणीसाठी ८ आणि ९ जून २०१८ रोजी एसटीतील कर्मचाऱ्यांनी अघोषित संप पुकारला होता. या संपामुळे प्रवाशांचे हाल तर झालेच, शिवाय एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. संप होऊ नये, यासाठी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला. त्यानुसार गुन्हेही दाखल केले. संप मिटल्यानंतर कामगार संघटनांच्या मागणीनुसार कामगारांवरील किरकोळ गुन्हे मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. परंतु कर्मचाऱ्यांना कारवाईतून सूट मात्र मिळालेली नाही.

संपाला कारणीभूत ठरलेल्या चालक-वाहकांवर आता कारवाईचा बडगा म्हणून त्यांच्या बदल्या रोखण्यात येणार आहेत. तशी तयारीच महामंडळाने सुरू केली आहे. एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झालेल्या सहा हजारांहून अधिक चालक-वाहकांनी एसटी महामंडळाकडे बदलीसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी काही चालक-वाहकांना १५ ते २० वर्षे झाली आहेत. त्यांची आकडेवारी घेऊन संपात कोण कोण सामील होते, याची माहिती घेण्यात आली. त्यानुसार बदलीसाठी अर्ज केलेल्या कामगारांपैकी तीन हजार ४७२ चालक-वाहक संपात सामील झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांची बदल रोखण्याची प्रक्रिया महामंडळाने सुरू केली आहे. तीन हजार ४७२ मध्ये १,३३४ वाहक आणि २,१३८ चालकांचा समावेश आहे. एसटीने ही कारवाई केल्यास आपल्या राहत्या ठिकाणी किंवा मूळ शहर वा गावांत परतण्याची इच्छा असलेल्या चालक-वाहकांच्या आशेवर पाणी फेरले जाईल.

..तर बदली थांबवता येते

एखादा चालक किंवा वाहकाला सेवेत तीन वर्षांपेक्षाही अधिक काळ झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांनी अर्ज केल्यास त्यांची बदली केली जाते. मात्र संप करून कामात अडथळा आणल्याने कारवाईचा भाग म्हणून बदली रोखताही येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. समजा, एखादा चालक किंवा वाहक मूळचा सोलापूरचा असेल आणि तीन वर्षे मुंबईत काम करत असेल तर तो पुन्हा सोलापूरला बदली मागू शकतो. परंतु या कारवाईमुळे त्याची बदली रोखली जाऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button