‘एमपीएससी’कडून ‘पीएसआय’च्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षात गोड बातमी मिळणार? मुख्यमंत्री सचिवालयाच्या कक्ष अधिकाऱ्याकडे फाईल…

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) २०२५ ला अवघे आठ दिवस शिल्लक आहे. मात्र, सरकारकडून अद्यापही यावर काहीही निर्णय झालेला नाही. जाहिरातीमध्ये एकूण ६७४ पदे जाहीर झाली असून त्यात पोलीस उपनिरीक्षकांसाठी (पीएसआय) ३९२ पदांचा समावेश आहे. या परीक्षेदरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एकवेळची विशेष संधी देण्याची मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे.
सरकार निर्णय घेत नसल्याने विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. परीक्षा चार दिवसांवर आली आहे. एमपीएससीने यासाठी प्रवेश पत्रही देणे सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम वाढला आहे. मात्र, मुख्यमंत्री सचिवालयातील एका अधिकाऱ्याकडे वयसवलतीसंदर्भातील फाईल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नवीन वर्षात गोड बातमी मिळणार का? अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याबाबत राजकीय वर्तुळातून सरकारवर रोज दबाव वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ आता माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील, शिवसेना नेते अक्षयमहाराज भोसले, खासदार अमोल कोल्हे, आमदार सत्यजित तांबे, आमदार नारायण पाटील, आमदार सुनील शेळके, आमदार संतोष दानवे, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, आमदार किरण लहामते, खासदार बजरंग सोनवणे, खासदार भास्कर भगरे, आमदार राजेश पाडवी, आमदार बाबाजी काळे अशा अनेक आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहेत. अनेकांनी ट्विट करूनही वय सवलतीची मागणी केली.
हेही वाचा – डब्बू आसवानी यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल
मात्र इतके होऊनही सरकारकडून अद्याप निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे ८ दिवसांवर परीक्षा आली आहे. त्यामुळे सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे. यापूर्वी माजी मंत्री जयंत पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अशा अनेक नेत्यांनीही या संदर्भात सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे वयाच्या सवलतीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. सामान्यतः ही जाहिरात डिसेंबर-जानेवारीत येते. त्यानंतर परीक्षा मार्च-मे महिन्यात होते. यावर्षी मात्र जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी निघून परीक्षा ४ जानेवारीला होणार आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे वयोमर्यादा मोजण्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही तारीख निश्चित केली आहे. यामुळे गेल्या ३-४ वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय १-२ महिन्यांनी अधिक झाले असून ते आपोआप अपात्र ठरत आहेत. पोलीस भरतीमध्ये २०२२-२५ दरम्यान वय ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य शासनाने एकवेळची विशेष संधी दिली होती. त्या धर्तीवर आता एमपीएससी संयुक्त गट-ब (विशेषतः पीएसआय) साठीही अशा विद्यार्थ्यांना एकवेळची वयोमर्यादा सवलत देण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध लोकप्रतिनिधींकडूनही पाठवण्यात आले आहेत.




