मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री, अधिकाऱ्यांची दांडी; मुख्यमंत्र्यांनी अशी व्यक्त केली नाराजी…

मुंबई : ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या धावपळीत आणि वर्ष अखेरच्या दिवशी, बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पण, या बैठकीला खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी दांडी मारली. शिवाय अनेक अधिकारी वर्षअखेरचा मुहूर्त साधून पर्यटनासाठी गेल्यामुळे बहुतांश अधिकाऱ्यांनीही दांडी मारली होती. सर्व दांडी बाहद्दर अधिकारी सुट्टीवर दिसतात, असे म्हणत कमी उपस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांची धावपळ उडाली होती. कॅबिनेट मंत्र्यांसह, राज्यमंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधींना पक्षाचे एबी फॉर्म दिलेल्यांना अर्ज भरण्यासाठी वेळेत कार्यालयात पाठविण्यासाठी, उमेदवारी नाकारलेल्यांची समजूत काढण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली. नाराजांच्या रोषाला सामोर जाण्याचे प्रकार तर अनेक ठिकाणी घडले.
मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारताच मंत्रिमंडळाला, राज्याच्या कामकाजाला शिस्त लागावी, यासाठी दर आठवड्याला मंत्रिमंडळ बैठक होईल, असे गृहीत धरून मुंंबई या, असे फार्मान खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सोडले होते. त्यानुसार दर आठवड्याला बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होते.
आज, झालेल्या बैठकीकडे महानगर पालिकांच्या धापवळीत असलेल्या कॅबिनेट बैठकीकडे पाठ फिरवली. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बैठकीला नव्हते. जेमतेम १४ – १५ मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. कॅबिनेट मंत्र्यांची संख्या सुमारे ३५ असताना फक्त १४-१५ कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत घ्यावी लागली. दुसरीकडे मंत्री गैरहजर असताना अधिकाऱ्यांनीही सर्रास दांडी मारली.
विविध विभागांचे सचिव वर्षअखेरीचा मुहूर्त साधत सुट्टीवर गेल्यामुळे बैठकीला अत्यल्प अधिकारी उपस्थितीत होते. मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गैर हजेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. हे सर्व दांडी बहाद्दर वर्षअखेरीच्या सुट्टीवर दिसतात, असा प्रकार पुन्हा होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.
मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात राज्यभरातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींची गर्दी असते. पण, महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकीय नेते, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी व्यस्त असल्यामुळे त्यांनाही मुंबईकडे पाठ फिरवली. बैठकीनंतर गाठी – भेठी घेण्यासाठी चढाओढ असते. पण, बुधवारी मंत्रालयात शुकशुकाट होता.




