मान्सून महाराष्ट्रात दाखल! आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharashtra Weather | केरळमध्ये वेळेत दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) शनिवारी महाराष्ट्राच्या तळकोकणात दिमाखात दाखल झाले आहेत. मान्सूनची वाटचाल अत्यंत समाधानकारक असून पुढील ३ ते ४ दिवसांत तो संपूर्ण अरबी समुद्रासह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत पुढे सरकण्यासाठी हवामानाची स्थिती पूर्णपणे अनुकूल आहे. दरम्यान, राज्यात सध्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून बहुतांश भागांत वादळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. आज, सोमवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाचा प्रवास वेगाने सुरू असून तो देशाच्या विविध भागांत पोहोचत आहे. रविवारी मान्सूनने बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांवर ताबा मिळवला. तसेच त्रिपुरा, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेशचा काही भाग व्यापला असून मिझोराम, मणिपूर आणि नागालँड या राज्यांचा संपूर्ण भाग आता मान्सूनच्या प्रभावाखाली आला आहे.
हेही वाचा
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! पाहा आजचे ताजे भाव..
दक्षिण कोकणात मुसळधार; सातारा, रत्नागिरीत जोर वाढणार
सध्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कणकवली, मालवण आणि कुडाळसह दक्षिण कोकणातील काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोकणपट्टीतील नागरिकांना कडक उन्हाळ्यापासून आणि उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
पुढील चार दिवस राज्याच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दुसरीकडे विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती असून काही ठिकाणी गारपिटीचीही नोंद झाली आहे.
आज ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मुंबई. ठाणे, पालघर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग आदी भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





