सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! पाहा आजचे ताजे भाव..

Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीच्या सुसाट वेगाला अखेर ब्रेक लागला असून, सोने आणि चांदीच्या किमतीत कमालीची घसरण झाली आहे. जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत बदललेल्या धोरणांमुळे दोन्ही मौल्यवान धातूंचे दर मोठ्या प्रमाणावर गडगडले आहेत. यामुळे लग्नकार्यासाठी दागिने खरेदी करणारे ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे.
इंडियन बुलियन वेबसाईटनुसार, आज सोमवार, ८ जून २०२६ रोजी सोन्याची किंमत प्रति तोळा १८९० रुपयांनी कोसळली. या घसरणीमुळे आता २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर १,५३,८७० रुपये इतका झाला आहे. सोन्याच्या आतापर्यंतच्या १,८०,००० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा सध्या सोने सुमारे २७,००० रुपयांनी स्वस्त मिळत आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत मोठी पडझड झाली असून दर थेट ६१०० रुपयांनी आपटले आहेत. सध्या प्रति किलो चांदीचा दर २,४३,०१० रुपये झाला आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी चांदीने ४,००,७८० रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत आज चांदी तब्बल १,५७,७७० रुपये स्वस्त मिळत आहे.
हेही वाचा
राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थ विक्रेत्यांवर १९५ धाडी
एका आठवड्यात किमती किती बदलल्या?
मागील आठवड्यात सोन्याच्या किमती ३.३४ टक्के इतक्या घसरल्या असून एक तोळ्याचे दर तब्बल ५३२० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. दुसरीकडे चांदी तब्बल ९.१२ टक्के इतकी घसरली. म्हणजे आठवड्यात चांदीच्या किमती २४,३८० रुपयांनी घसरल्या आहेत.
पंतप्रधानांचे आवाहन आणि आयात शुल्काचा फटका
मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेल्या या मोठ्या घसरणीमागे केंद्र सरकारची धोरणे अत्यंत प्रभावी ठरली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मे २०२६ रोजी हैदराबाद येथील सभेतून देशवासियांना परकीय चलन वाचवण्यासाठी पुढील वर्षभर सोने खरेदी न करण्याचे महत्त्वाचे आवाहन केले होते. या आवाहनासोबतच सरकारने सोने-चांदीवरील आयात शुल्क थेट दुप्पट करत १५ टक्के केले आहे. या दुहेरी धोरणामुळे देशात सोन्याच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते, दागिन्यांच्या खरेदीत ७० टक्क्यांपर्यंत मोठी घट झाली आहे. दुसरीकडे, जागतिक स्तरावर औद्योगिक मागणीतील अनिश्चिततेमुळे चांदीच्या किमतीही सातत्याने कोसळत आहेत.





