राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

Maharashtra Unseasonal Rain News : राज्यात हवामानात मोठा बदल झाला आहे. एका बाजुला तापमानात वाढ झाली असतानाच दुसऱ्या बाजूला विविध भागात अवकाळी पाऊस सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. यामध्ये सोलापूर, पंढरपूर, परभणी, इंदापूर या भागात वादळी पाऊस सुरु आहे. तर काही भागात वीज पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
इंदापूर तालुक्यात काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. इंदापूर तालुक्याच्या कांदलगाव सरडेवाडी शहा हिंगणगाव यासह उजनी पट्ट्यात रात्री पावणे नऊ वाजल्यापासून हा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस कोसळत असल्याने यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील आता वर्तवली जात आहे.
पंढरपुरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पंढरपूर शहरासह आसपासच्या ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसात आहे. याच काळात पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याची देखील घटना घडली. यामध्ये झाड जळाले गेले मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये द्राक्ष, डाळिंबा सारख्या फळबागांच्या पिकांना चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे एकाच दिवशी चार ठिकाणी वीज पडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे. बनकर माळी वस्ती येथे उसात वीज पडून उसाने पेट घेतला. तर गावाशेजारील मुस्लिम कबरस्थान येथील मिरीच्या झाडाजवळ वीज पडून तेथील कडबा पेटला. जळकेवाडी येथील नारळाच्या झाडावर एक ठिकणी तर बाळू जगताप यांच्या आंब्याच्या झाडावर वीज पडून झाड पूर्ण जळून खाक झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. पण एका पाठोपाठ चार वीज व काल एक अशा पाच विजा पडल्याने खर्डी ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा – राखीव साठा मिळाला नाही तर मुंबईकरांवर यंदा पाणी कपातीची वेळ ? पाणीसाठा ३२ टक्क्यांवर
परभणी जिल्ह्यात दिवसभर प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, संध्याकाळच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल होत विजेच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्याने आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांत अशाच प्रकारच्या पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूरच्या अक्कलकोट मध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव, हन्नूर, दर्शनाळ आदी गावांना पावसाने झोडपले आहे. अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेल्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथील अर्जुन गाडेकर या शेतकऱ्याच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने गहू, ज्वारी, कांदा पिके भिजून गेले. याशिवाय अनेक भागत काढलेले पीक भिजली आहेत.





