ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुनावळेतील सर्व्हिस रोडचे तातडीने सिमेंट काँक्रीटीकरण करा; NHAI कडे भाजपाचे नवनाथ ढवळे यांची मागणी

नागरी समस्या: मुसळधार पावसामुळे पुनावळे अंडरपास ते पवना नदीदरम्यानचे रस्ते खड्डेमय

पिंपरी-चिंचवड | पुनावळे अंडरपास ते पवना नदीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या उजव्या व डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडचे तातडीने सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजप पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्ष नवनाथ मारुती ढवळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) केली आहे.

यासंदर्भात कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोथरूड, पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुनावळे अंडरपास ते पवना नदीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली असून, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. विशेषतः परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दररोज या मार्गाचा वापर करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा

हिंदूभूषण स्मारक परिसरात विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या दोन्ही सर्व्हिस रोडचे डांबरीकरण न करता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे आणि ही कामे युद्धपातळीवर हाती घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी नवनाथ ढवळे यांनी केली आहे.

दरम्यान, या निवेदनाची प्रत आमदार शंकर जगताप यांनाही पाठविण्यात आली असून, संबंधित यंत्रणांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

“पुनावळे परिसरातील सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे तात्पुरत्या डागडुजीऐवजी सिमेंट काँक्रीटीकरणासारखा कायमस्वरूपी उपाय करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड होऊ नये, हीच आमची भूमिका आहे.”

– नवनाथ ढवळे, उपाध्यक्ष, भाजप पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा).

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button