ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीत भर

गणेशोत्सव आणि पावसाची रिपरिप यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत वाहनांची तोबा गर्दी

नाशिक : आगामी गणेशोत्सव आणि पावसाची रिपरिप यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत वाहनांची गुरुवारी तोबा गर्दी झाली होती. त्यामुळे स्मार्टरोडवर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यातच स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकवर असलेल्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीत आणखीच भर पडली. तर, मुख्य बाजारपेठ असलेल्या एम.जी. रोड, मेनरोड, शालिमार, शिवाजी रोड, रविवार कारंजा या परिसरात दिवसभर वाहतुकीची कोंडीची समस्या कायम होती. शनिवारपासून (ता. ७) गणेशोत्सवाला प्रारंभ होतो आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली असून ग्राहकांच्या गर्दीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. तसेच, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी (ता.५) पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर पुन्हा वाहनांची वर्दळ वाढली. त्याचा परिणाम शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील वाहतुकीवर झाला होता. सीबीएस चौकाकडून अशोकस्तंभ या स्मार्ट रोडवर वाहतूक कोंडीमुळे लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या. तर एम.जी. रोड, गंगापूर रोडवरही वाहतूक कोंडी होऊन, अशोकस्तंभ चौकातील विस्कळीत वाहतुकीमुळे स्मार्टरोडवर कोंडी निर्माण झाली होती.

स्मार्टरोडवर अनधिकृत पार्किंग

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा स्मार्टरोड तयार करण्यात आला, परंतु वाहतुकीसाठी रस्ता स्मार्ट होण्याऐवजी वाहतूक कोंडीचाच हा रस्ता मानला जातो. स्मार्ट रोडच्या दुतर्फा सायकल ट्रॅक आणि त्यावर प्रशस्त फुटपाथ आहे. परंतु या दोन्ही ठिकाणी अनधिकृत पार्किंग आणि व्यावसायिकांनी अतिक्रमण थाटले आहे. त्यामुळे स्मार्ट रोड वाहतुकीसाठी आणखी अरुंद होऊन कोंडीची समस्या याठिकाणी नित्याचीच झाली आहे. त्यातच, रिक्षाचालकांकडूनही अनधिकृत थांबे थाटले असून, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होते.

कारवाईकडे दूर्लक्ष

स्मार्ट रोड, एमजी रोड, शिवाजी रोड, रविवार कारंजा, शालिमार या परिसरात अनधिकृतपणे वाहनांची पार्किंग केली जाते. शहर वाहतूक पोलीस शाखेकडून टोईंग आणि इ-चलानद्वारे दंडात्मक कारवाईही केली जाते. परंतु नित्याची वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांकडेच मात्र वाहतूक पोलिसांकडून कारवाईकडे दूर्लक्ष केले जाते. यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त असणार्यांमध्ये नाराजी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button