Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत २०१७ चा फॉर्म्युला

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक अधिक निवडून आले तर मुंबईचे महापौर पद शिंदे सेनेच्या ताब्यात असेल, असा विश्वास रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात होतील, असे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. तर सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे निर्देश महायुतीच्या नेत्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती स्वबळावर न लढता एकत्र लढेल.

मात्र, सत्तेत आल्यानंतर २०१७ चा फॉर्म्युला वापरला जाईल. भाजपकडे त्यावेळी मुख्यमंत्री पद होते. तर शिवसेनेकडे मुंबई महापालिकेत महापौर पद होते. आगामी निवडणुकीनंतर त्याच पद्धतीने निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. दरम्यान, भाजपला स्थायी समिती तर शिवसेनेकडे महापौरपद ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुंबई महापालिका ही महत्वाची महानगरपालिका आहे. गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता होती. शिवसेनेच्या सत्तेला अनेक राजकीय पक्षांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – रेल्वेमार्गावर झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईतील लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार

२०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेला ८४ जागा जिंकता आल्या. तर भाजपने ८२ जागा जिंकून शिवसेनेला आव्हान दिले. दरम्यान, पालिकेत सत्ता राखण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागली. भाजपने त्यावेळी सुरूवातीला पहारेकरी नंतर सेनेला बाहेरून पाठिंबा दिला. शिवसेनेचा महापौर झाला होता. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्रीपद असल्याने शिवसेनेला महापौर पद दिल्याचे बोलले जात होते. आता हाच फॉर्म्युला येत्या निवडणुकीनंतर वापरला जाणार असल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणूक होत आहे. मुंबईत आधीपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. मुंबईतील अनेक भाग शिवसेनेचे बालेकिल्ला म्हणून आजही ओळखले जातात. भाजपने १५० जागांवर दावा केला तरी तेवढ्या जागा सद्यस्थितीत देणे योग्य ठरणार नाही. तिन्ही घटक पक्षांकडून जागा वाटपात सामंजस्य भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय सुरू असल्याचे ते म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button