रेल्वेमार्गावर झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईतील लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार

मुंबई | मध्य रेल्वे रेल्वेमार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात झाला. लोकलमधून आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. सकाळी ९:३० वाजता मुंब्रा आणि दिवा दरम्यान ही दुर्घटना घडली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातानंतर आता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील लोकल ट्रेनला आता बंद होणार दरवाजे बसवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे की मुंबई उपनगरीय रेल्वेअंतर्गत तयार होणाऱ्या प्रत्येक कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवले जातील. याशिवाय सध्या वापरात असलेल्या मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे रीडिझाईनिंग करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये देखील ऑटोमॅटिक दरवाजे बंद होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
हेही वाचा : मुंबईत गर्दी नवी नाही, पण रेल्वे मंत्री काय करतात? ट्रेन दुर्घटनेवरुन राज ठाकरे संतापले
मिळालेल्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेवर ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या मार्गावर १ जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान रेल्वे अपघातात आतापर्यंत एकूण ६६३ जणांचा मृत्यू झाला. यातील २७२ जण धावत्या लोकलमधून पडल्याने आणि ३९१ जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला आहे.